भावाला किडनी दान करून ‘ती’ने पुन्हा जीवनरेषा उजळली..! | पुढारी

भावाला किडनी दान करून ‘ती’ने पुन्हा जीवनरेषा उजळली..!

सूर्यकांत वरकड

नगर : कुटुंबाचा आधारवड असलेल्या भावाला दूर्धर आजार झाल्याचे समजताच, ‘ती’ कोसळली खरी; पण यातूनही काही मार्ग काढण्यासाठी ‘ती’ खंबीर झाली. दोन कुटुंबांचा आधार असलेली जीवनरेषा मिटते की, काय? असे वाटत असताना भावाला किडनी दान करून ‘ती’ने पुन्हा जीवनरेषा उजळली..! ही कहाणी आहे, नगरच्या परदेशी-तिवारी कुटुंबाची. बहीण भावाचे नात फक्त राखी पुरतचं अथवा भाऊबीजेला ओवाळणी पुरताच मर्यादित नसत, तर ते एकाच ‘आई’च्या उदरातून आलेल्या दोन जिवांच्या पलीकडचं नातं असतं. कोविड काळात कोणीच कोणाच नसतं, अशी प्रचिती अनेकांना आली. पण, त्याला छेद दिला तो नगरच्या परदेशी- तिवारी कुटुंबातील भावंडांनी. दुर्धर आजारात असलेल्या भावाला बहिणीने किडनी देऊन त्याला नवाजन्म दिला.

नागेश गणेशप्रसाद परदेशी (वय 42 मुळ रा. डोंगरी, ता. पाटोदा, जि. बीड), संतोषी राजेंद्र तिवारी (वय 52, रा. नगर), असे त्या बहिणभावंडाचे नावे आहेत. आई, वडील, बहीण अस नागेशचे छोटेसे कुटुंब. वडील ग्रामसेवक असल्याने नेहमीच स्थलांतराची वेळ. वडिलांची नोकरी बराचकाळ आष्टी तालुक्यातील राहिली. त्यांचे प्राथमिक शिक्षण आष्टी तालुक्यात झाले. बहिणीचे लग्न झाल्यानंतर नागेश 1996 साली शिक्षणासाठी नगर शहरात तिच्या घरी आला. बहिणीच्या घरी पारंपारिक खानावळीचा व्यवसाय होता. साधारण दोन वर्षाचा कालावधीनंतर मेहुण्याचे निधन झाले. बहिणीला चार वर्षाची मुलगी, दोन वर्षाची मुलगा होता.

या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी नागेश यांच्यावर आली. बहिणीचे कुटुंब हेच आपलं कुटुंब असं म्हणून नागेश यांनी बहिणीचा पारंपरिक खानावळीचा व्यवसाय चालविण्यास सुरुवात केली. बहिणीची दोन लहान मुलं, स्वतःची दोन लहान मुलं आई-वडील असं मोठं कुटुंब घेऊन अगदी कष्टाने बहीण-भाऊ खानावळ चालू लागले. साधारण वीस वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर अगदी बापाच्या भूमिकेतून नागेश यांनी बहिणीच्या मुलीचा आणि मुलाचा विवाह लावला. आता, दोन्ही कुटुंब सुखात होती; पण नियतीला हे मान्य नसावे. 20 फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान चार ते आठ दिवस नागेश यांना प्रचंड ताप आला. त्यावर त्यांनी औषधे घेतली. परंतु, आठ दिवस झाले तरीही ताप उतरला नाही. शेवटी डॉक्टरांकडे गेले आणि तपासणी केल्यानंतर आजाराचे निदान झाले.

नागेश यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. कुटुंब हादरून गेले. आता काय करावे नागेश यांना कळत नव्हते. डॉक्टरांनी सांगितले, तुमच्या हातात अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी आहे. याच कालावधीमध्ये किडनी रोपणाची शस्त्रक्रिया होऊ शकते अन्यथा आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असेल. दरम्यानच्या काळात नागेश यांचे डायलेसिस सुरू होते. डॉक्टरानी किडनी रोपण शस्त्रक्रिया हाच उपाय सांगितला होता.

मात्र, किडनी कोण देणार हा प्रश्न उपस्थित झाला. आई किडनी देण्यास तयार झाली पण, तिला शुगर, ब्लड प्रेशर अशा व्याधी होत्या. या संकटात बहीण धावून आली. बहीण भावाला किडनी द्यायला तयार झाली. औरंगाबादमधील हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. बहिणीची एक किडनी नागेशला जीवदान देणारी ठरली. आजमितीला नागेश परदेशी आणि बहीण संतोषी तिवारी यांची प्रकृती ठणठणीत आहे.

कोट्यधीश असूनही कोणीही एकमेकांना किडनी द्यायला तयार होत नाही, अशी उदाहरणे समाजामध्ये आहेत. परंतु,माझ्या बहिणीने किडनी देऊन मला जीवदान दिले. समाजातील बहीण-भावानी एकमेकांना प्रेम देऊन संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
– नागेश परदेशी, नगर

आपला भाऊ आपल्या पाठीशी राहावा हीच सदैव परमेश्वर चरणी माझी प्रार्थना आहे. त्यामुळे मी कोणतीही अपेक्षा न ठेवता दादाला किडनी देण्यास तयार झाले. त्यासाठी माझा मुलगा, मुलगी, जावई यांनी कोणीही विरोध केला नाही. प्रत्येक बहीण-भावाचे प्रेम सदैव असेच रहावे.

-संतोषी राजेंद्र तिवारी, नगर

Back to top button