Home Voting : जिल्ह्यात आजपासून ज्येष्ठांच्या मतदानास प्रारंभ, मतदारसंघाना मतपत्रिकांचे वितरण | पुढारी

Home Voting : जिल्ह्यात आजपासून ज्येष्ठांच्या मतदानास प्रारंभ, मतदारसंघाना मतपत्रिकांचे वितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील ८५ वर्षावरील घरबसल्या मतदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी गुरुवारपासून (दि.९) मतदानास प्रारंभ होत आहे. त्यानूसार जिल्हाधिकारी कार्यालयातून नाशिक व दिंडोरी मतदार संघा अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले.

नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार (दि.२०) मतदान घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. यंदाच्या निवडणूकीत प्रत्येकाला त्याचा मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. आयोगाच्या सुचने नूसार यंदा निवडणूकीत पहिल्यांदा ८५ वर्षावरील ज्येष्ठांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तसेच ४० टक्यांहून अधिक दिव्यांगानाही घरीच पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ८५ वर्षांवरील ६५ हजारांपैकी १ हजार २६४ वृध्द तसेच २१२ दिव्यांगांनी घरबसल्या मतदानासाठी नोंदणी केली आहे. यासर्व मतदारांना गुरुवारपासून टपाली मतपत्रिकेद्वारे घर बसल्या मतदान करता येणार आहे. त्यासाठी पंधराही विधानसभा मतदारसंघात पथके तैनात करण्यात आली आहे. टपाली मतदानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयातून नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी प्रत्येकी १५ हजार टपाली मतपत्रिकांसह ईव्हीएम, सैनिकी तसेच मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठीच्या मतपत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी पंधराही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदर मतपत्रिका ताब्यात घेतल्या.

२१ हजार कर्मचारी नियुक्त
जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात एकुण ३ हजार ८३२ मतदान केंद्र आहेत. तर निवडणूक प्रक्रियेसाठी २१ हजार १४० निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी १६ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलेल्या मतदान केंद्रावरच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. उर्वरित ६ हजार ४१० कर्मचारी मतदारांना त्यांच्या निवासी मतदारसंघाच्या बाहेर नियुक्ती मिळाल्याने त्यांच्यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button