उष्णतेचा तडाखा कायम! हवामान खात्याचा ‘या’ भागात अवकाळी पावसाबाबत चिंतेचा इशारा | पुढारी

उष्णतेचा तडाखा कायम! हवामान खात्याचा 'या' भागात अवकाळी पावसाबाबत चिंतेचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील तीन दिवस गारपिटीसह वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पाऊस आणि कोकणात कोरडे हवामान राहणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट सुरूच असून, कमाल तापमानाचा पारा 41 अंशांच्या पुढे कायम राहिला आहे. याबरोबरच रात्रीच्या उकाड्यातही चांगलीच वाढ झाली आहे.

दरम्यान, बुधवारी मालेगाव शहराचे तापमान राज्यात सर्वात अधिक नोंदले गेले. तेथे 41.6 अंश सेल्सिअसच तापमान आहे. उर्वरित राज्यातही कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढेच आहे. राज्यात मागील महिन्यापासून दिवसा तीव्र उष्णता आणि रात्रीचा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण आहेत. त्यातच आता विदर्भ, मराठवाड्यात गारपीट, अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. सध्या तीव्र उष्णतेच्या झळा आणि पावसाचा तडाखा बसत आहे.

याबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीपासून मध्य महाराष्ट्र, कोकण पार करून वायव्य राजस्थानपर्यंत द्रोणीय स्थिती, विखंडित वारे तसेच कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. विदर्भात गारपीट, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. पुढील तीन ते चार दिवस जळगाव, नगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या भागांत गारपीट आणि अवकाळी पाऊस पडणार आहे.

काही दिवस हवामान कायम राहणार

अवकाळी पावसाबरोबरच राज्यातील सर्वच भागांत तीव्र उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, रात्रीच्या उकाड्यातही चांगलीच वाढ झाली आहे. तीव्र उष्णतेच्या झळा आणि उकाडा पुढील काही दिवस कायम राहणार आहे.

हेही वाचा

Back to top button