लोकसभा निवडणूक २०२४: निम्म्या मराठवाड्याचे अर्धे चित्र स्पष्ट! | पुढारी

लोकसभा निवडणूक २०२४: निम्म्या मराठवाड्याचे अर्धे चित्र स्पष्ट!

मराठवाडा वार्तापत्र: धनंजय तांबे

नांदेड आणि जालन्यातून भाजपचे उमेदवार कोण, हे बुधवारी (दि. 13) दुसर्‍या यादीतून स्पष्ट झाले. मराठवाड्याच्या आठपैकी चार जिल्ह्यांत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे आता त्यांची लढत कुणाशी, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चारपैकी बीड या एकमेव मतदारसंघात भाजपने उमेदवार बदलला आहे. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या थोरल्या भगिनी पंकजा मुंडे यांना संधी देऊन पक्षाने त्यांचा विजनवास तर संपवलाच; शिवाय परळी या विधानसभा मतदारसंघावरील पंकजा मुंडे यांच्या दाव्यालाही पूर्णविराम दिला. (Lok Sabha Election Marathwada)

वास्तविक, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी इतके काम या जिल्ह्यात करून ठेवले आहे की, त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला निवडणुकांमध्ये फारसे अडथळे येत नाहीत. त्यांच्या ज्येष्ठ कन्या पंकजा या त्यांच्या तालमीत तयार झालेल्या होत्या; तथापि डॉ. प्रीतम मुंडे या गोपीनाथरावांच्या हयातीत राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या. तरीही त्यांनी 2014 मध्ये लढविलेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे सात लाखांचे मताधिक्य मिळविले. 2019 च्या निवडणुकीत मात्र हे मताधिक्य 1.68 लाखावर आले. त्यांच्याऐवजी पंकजा यांना संधी देण्यामागील हेदेखील एक कारण असू शकते. बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नरेंद्र काळे, सुशिला मोराळे यांची नावे चर्चेत आहेत. गेल्यावेळी पराभूत झालेले बजरंग सोनवणे सध्या अजित पवार गटात आहेत; परंतु ते शरद पवार गटात जाऊन पंकजा मुंडे यांना आव्हान देऊ शकतात, अशीही जिल्ह्यात चर्चा आहे. शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते यांच्या पत्नी ज्योती मेटे यादेखील इच्छुक असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. (Lok Sabha Election Marathwada)

भाजपकडून नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेचे सदस्यत्व मिळविल्यानंतर नांदेड जिल्ह्यात ‘बदल’ होतो की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, प्रतापराव पाटील-चिखलीकर यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. गेल्या निवडणुकीत चिखलीकर यांना 4.86 लाख, अशोक चव्हाण यांना 4.46 लाख आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांना 1.66 लाख मते मिळाली होती. या आकडेवारीवरून अनेक अर्थ काढले गेले; परंतु वंचित आघाडीमुळे अशोक चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला, हा अर्थ अधोरेखित झाला. वास्तविक, प्रा. भिंगे यांनीही विजयाच्याच दिशेने वाटचाल सुरू केली होती. यावेळी चव्हाण यांच्यावर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रतापराव यांच्याविरुद्ध काँग्रेसचे कोण, ही उत्सुकता आहे. त्यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यामुळे हिंगोली जिल्ह्याचे विद्यमान खासदार हेमंत पाटील नांदेडमधून निवडणूक लढविण्याची शक्यता मावळली आहे. त्यांना शिवसेनेने पुन्हा संधी दिली, तर हिंगोलीतूनच नशीब आजमावावे लागणार आहे.

दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचा गड असलेल्या लातूर या राखीव मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा खा. सुधाकर शृंगारे यांना संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना 6.61 लाख, तर प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांना 3.72 लाख मते मिळाली होती. या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीच्या राम गारकर यांनी 1.12 लाख मते मिळविली होती. मजूर, कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, जि. प. सदस्य असा प्रवास करून आलेले शृंगारे यांची तळागाळातील सर्वसामान्यांशी नाळ जुळलेली असल्यामुळेच त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी कोण असतील, याविषयी तर्कवितर्क बांधले जात आहेत. काँग्रेसकडून कोणाचेही नाव अद्याप जाहीर झालेले नाही. तथापि, माजी सनदी अधिकारी भा. ई. नगराळे यांच्याच एकमेव नावाची सध्या काँग्रेसकडून चर्चा आहे.

जालना मतदारसंघातून सलग पाचवेळा लोकसभेवर गेलेले विद्यमान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला जालना मतदारसंघ दानवे यांनी चांगला बांधून ठेवला आहे. इतर पक्षांमधील त्यांचे संबंध त्यांना नेहमीच लाभदायक ठरत आले आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसकडून मागील निवडणुकीत तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेले विलास औताडे, तसेच माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत (उबाठा) दाखल झालेले संजय लाखे-पाटील यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परभणी मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) गटाचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासह महाविकास आघाडीकडून राजेश विटेकर (राष्ट्रवादी अजित पवार) अथवा मा. आ. रामप्रसाद बोर्डीकर, डॉ. केदार खटींग, (भाजप, महायुती) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिंगोली मतदारसंघात अजून कोणाचेही नाव जाहीर झालेले नाही. विद्यमान खासदार हेमंत पाटील (शिवसेना शिंदे गट) तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ठाकरे गटाकडून नागेश पाटील-आष्टीकर, रूपाली पाटील-गोरेगावकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, सचिन नाईक, भाजपकडून रामदास पाटील आणि शिवाजी माने यांची नावे चर्चेत आहेत. धाराशिव मतदारसंघात विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांनाच शिवसेना (उबाठा) पुन्हा संधी देईल, अशी शक्यता आहे. महायुतीत हा मतदारसंघ भाजपला सुटला, तर अभिमन्यू पवार, प्रवीणसिंह परदेशी, राणाजगजितसिंह पाटील यांची, शिवसेना शिंदे गटाचे धनंजय सावंत किंवा पालकमंत्री तानाजी सावंत यांची आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

हे ही वाचा:

Back to top button