NMC News | शहरात आता आठ ठिकाणी ‘पे ॲण्ड पार्किंग’ ; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय | पुढारी

NMC News | शहरात आता आठ ठिकाणी 'पे ॲण्ड पार्किंग' ; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट पार्कींगचा तिढा कायम असताना आता शहरात आठ ठिकाणी पे ॲण्ड पार्कींगची (Pay and Park) सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गोदाघाट तसेच नाशिक पश्चिम विभागात प्रत्येकी चार पे ॲण्ड पार्कची उभारणी केली जाणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात प्रत्येक वाहनतळाकरीता स्वतंत्र देकार मागविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी आठ ठिकाणी पे ॲण्ड पार्क (Pay and Park) प्रस्तावित असून त्यासाठी जागांचा शोध घेण्याचे निर्देश बांधकाम विभाग तसेच वाहनतळ समितीला देण्यात आले आहे.

नाशिक शहरात वाहनतळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. प्रामुख्याने शालिमार, सीबीएस, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मेनरोड, सराफ बाजार तसेच कॉलेजरोड, शरणपूररोड सारख्या बाजारपेठेच्या ठिकाणी वाहनतळांचा प्रश्न बिकट आहे. महापालिकेने गेल्या १० वर्षांपासून वाहतूक आणि पार्किंगच्या प्रश्नावर काम सुरू केले असले तरी त्याला पुरेसे यश आलेले नाही. त्यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात असल्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने बहुमजली पार्किंग स्थळं विकसित करण्याची घोषणा केली होती. मात्र ती वास्तवात उतरू शकली नाही. स्मार्ट पार्किंगचा पुरता खेळखंडोबा झाला असून, प्रशासकीय उदासीनता आणि राजकीय हस्तक्षेपामुळे संबंधित ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला आहे. आता उत्पन्न वाढीसाठी का होईना महापालिकेने वाहनतळ विकासाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पहिल्या टप्प्यात आठ ठिकाणी पे ॲण्ड पार्क (Pay and Park) उभारले जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील वाहनतळ समितीने पहिल्या टप्प्यात सूचवलेल्या आठ ठिकाणांसाठी पुढील आ‌ठवड्यात स्वतंत्रपणे देकार मागविले जाणार आहेत. पार्कींगच्या ठेक्यात मक्तेदारी निर्माण होऊ नये यासाठी पे ॲण्ड पार्कसाठी प्रत्येक जागेकरीता स्वतंत्र देकार मागविण्यात येत आहेत. (Pay and Park)

नव्या पार्किंग स्थळांचाही शोध
आणखी आठ नव्या पार्कींग स्थळांचा शोध घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेने बांधकाम केलेल्या इमारतींसह मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मिळकतींमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देता येईल काय याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना आहेत.

या ठिकाणी होणार पे ॲण्ड पार्क (Pay and Park)
रामकुंड, सीता गुंफा, म्हसोबा पटांगण, यशवंत महाराज पटांगण, बी.डी. भालेकर मैदान, कॅनडा कॉर्नर, मुंबई नाका.

हेही वाचा:

Back to top button