नवी दिल्ली : काश्मिरातील किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळाप्रकरणी सीबीआयने गुरुवारी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निवासस्थान आणि त्यांच्याशी संबंधित 30 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यांत प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना किश्तवाल जिल्ह्यात चिनाब नदीवर किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित हे प्रकरण आहे. 2200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने गेल्या महिन्यात दिल्ली आणि काश्मिरातील 8 ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणात सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट कंपनीचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चोधरी, इतर माजी अधिकारी एम. एस. बाबू, एम. के. मित्तल, अरुणकुमार मिश्रा आणि पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.
त्याच प्रकरणात गुरुवारी सीबीआयने मलिक यांच्या निवासस्थानासह एकूण 30 ठिकाणी छापे टाकले. नवी दिल्ली, हरियाणा, मुंबई आणि जम्मू काश्मिरातील ही ठिकाणे आहेत. त्यातील काही ठिकाणे मलिक यांच्याशी संबंधित आहेत. आजच्या छाप्यांत काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचा दावा सीबीआयने केला आहे. गुरुवारी राजीव दहिया, सुरेंद्र कुमार गुप्ता, अरुण कुमार आणि ऋषीकुमार शर्मा यांच्या कार्यालय व घरांवरही छापे टाकण्यात आले.