क्रांतिवीर नागनाथ अण्णा राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या एका अटीमुळे ४० वर्षांनी घराची पायरी चढले | पुढारी

क्रांतिवीर नागनाथ अण्णा राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या एका अटीमुळे ४० वर्षांनी घराची पायरी चढले

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

प्रसाद माळी : पुढारी ऑनलाईन

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांना नेहमी वाटत होतं की एखादा तरी राष्ट्रपती आपल्या वाळव्यात यावा. पण अनेक प्रयत्न करुन ही तो योगा योग जुळून आला नाही. पण, अण्णांची ही इच्छा अनेक वर्षांनंतर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पूर्ण केली.

नागनाथ अण्णांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय होतं. प्रतिभाताई यांचे वाळव्यात येणेही सहजा सहजी झालं नाही. त्यांनी वाळव्यात येण्यासाठी एक अट घातली. ही अट अण्णांसाठी एक व्रत मोडण्यासारंख होतं. या अटीचा संबध त्यांच्या एकूण संसाराशी निगडीत होता. ही अशी अट होती की ज्यामुळे अण्णांना त्यांचे ४० वर्षांचे व्रत मोडावे लागणार होते. ती अट काय होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा नागनाथ अण्णांचा संसार कसा आणि कोणत्या अटीवर सुरु झाला ते पहावे लागेल.

अधिक वाचा :

नागनाथ अण्णा
क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी व सौ. कुसुमताई नायकवडी

नागनाथ अण्णांंची स्वांतत्र्य संग्रामात उडी

बालपणीच शिक्षण अर्धवट सोडून नागनाथ अण्णांनी स्वांतत्र्य संग्रामात उडी घेतली. नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडलं. त्यांच्या संपूर्ण क्रांतिकारी आहुतीला यश आले आणि देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळूण सुद्धा हा क्रांतिकारक कष्टकरी, गरीब, पीडित, दलित समाजाला स्वकीयांच्या सत्तेत न्याय देण्यासाठी अखंड कार्यरत राहिला.

लग्नासाठीची अण्णांची अट

स्वातंत्र्यानंतर अण्णांचे समाजकार्य, चळवळ सुरुच होती. पुढे साधारण १९५० चे साल होते अण्णांच्या आई क्रांतिमाता लक्ष्मीबाई यांनी नागनाथ अण्णांचे लग्न जुळवण्याच्या मागे लागल्या. भिलवडी स्टेशन जवळ बुरुंगवाडी येथील यशवंत कदम यांची कन्या कुसुमताई यांच्याशी नागनाथ अण्णांचे लग्न ठरले. पण नागनाथ अण्णांनी आपल्या भावी सासऱ्यांना ठणाकावून सांगितलं, मी १९४२ च्या आंदोलनातला कार्यकर्ता आहे. या सगळ्या चळवळीत मी अनेकांना अंगावर घेतलंय आणि अनेक शत्रू ही बनवले आहेत. माझ्या बरोबर संसार करणं जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही. मला कधीही आणि केव्हाही काहीही होऊ शकतं. हे तुम्ही तुमच्या मुलीला सांगा. हे सर्व तिला मान्य असेल तर पुढे लग्न होईल.

अत्यंत साधेपणाने फक्त हार घालून केलं लग्न

अण्णा सर्वपरिचित व्यक्तीमत्त्व होतं. असे स्थळ पुन्हा येणार नव्हतं त्यामुळे कुसुमताई यांनी अण्णांशीच लग्न करण्याचं ठरवलं. नागनाथ अण्णा क्रांतिकारी, गांधी आणि सत्यशोधकी विचारांचे होते. फक्त ते विचार घेत नसत तर प्रत्यक्ष त्याचे पालन देखिल करायचे. लग्नासाठी कोणतेही नवे कपडे न घेता रोजच्या जुन्या कपड्यांवर अण्णांनी कुसुमताईंशी लग्न केलं. हे लग्न कोल्हापुरातील अण्णांचे शिक्षक अय्यरसर यांच्या घरी पार पडलं. मुहूर्त, भटजी, तांदूळ, मंगलअष्टका यांना फाटा देत फक्त वधू वरांनी एकमेकांना हार घातला आणि लग्न पार पडलं.
अण्णा अगदी शेवटच्या काळापर्यंत म्हणत, की लग्नाला देव, भटजी, मुहूर्त, पत्रिका, मंगलअष्टक, पैसा, पाहुणेरावळे यांची गरजच काय? याला फाटा देऊन आम्ही केलेलं लग्न अगदी शेवटपर्यंत टिकलं.

अधिक वाचा :

नागनाथ अण्णा व कुसुमताईंचे बॉन्डींग

नागनाथ अण्णा आणि कुसुमताईंचा संसार सुरु झाला. नागनाथ अण्णांनी कुसुमताईंना देखिल चळवळींच्या विचाराने घडवले. कुसुमताई यांनी देखिल अण्णांच्या खांद्याला खांदा लावत घर ही सांभाळलं आणि चळवळीचे विचार घेत प्रंसगी आंदोलनात ही उतरल्या. अण्णांच्या तालमीत त्या देखिल चांगल्याच तयार झाल्या होत्या.

त्यांचं बॉन्डींग येवढं वाढलं की, अण्णा आता काय करणार आहेत, कोणता निर्णय घेणार आहेत यांची त्यांना कल्पना असायची किंवा त्यांचा मनातलं त्यांनी आधीच ओळखलेलं असायचं. लग्नानंतर पुढे अण्णांचा संसार फुलत गेला. त्यांना दोन मुली आणि तीन मुले अशी आपत्येही झाली.

नागनाथ अण्णा आणि कुसुमाताईंच्या संसारातील ट्वीस्ट

नागनाथ अण्णा व कुसुमताई यांच्या संसारात एक मोठा ट्विस्ट होता. तर तो कोणता? अण्णा म्हणजे अगदी व्रतस्थ माणूस सर्व सामान्यांच्या उद्धारासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले होते. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर त्यांनी ‘किसान शिक्षण संस्था’ स्थापन करत वाळव्यात हुतात्मा किसान अहिर यांच्या नावाने विद्यालय काढले होते. हे विद्यालय म्हणजेच अण्णांचं घर होतं.

अण्णा आपल्या मूळ घरी फारसं जात नसत. अण्णांचं घर, कुटुंब हे सारं ती शाळेतील खोलीच होती. माझी गरज समाजाला आहे. मी समाजाचा आहे, असे अण्णा म्हणत असत. त्याचं सगळं काम हे त्या शाळेतूनच चालत असे. शाळेतच त्यांना घरून डबा येत असे व घरच्यांनाही अण्णाना भेटायचे झाले तर ती व्यक्ती शाळेतच जात असे. लग्नांनंतर ही अण्णाचं असच सुरु होतं. तसं अण्णांनी फारच कमी वेळ कुटुंबाला दिला. अण्णांसाठी सर्व समाजाचं त्यांचा कुटुंब होता.

अधिक वाचा :

कुसुमताईंनी घेतली कुंटुंबाची जबाबदारी

लग्नानंतर अण्णा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, लिफ्ट इरिगेशनची चळवळ, वाळव्याचा विकास, पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे या त्यांचा चळवळीत व्यस्त राहिले. पुढे १९५७ ला अण्णा आमदार सुद्धा झाले. पण, त्यांनी आपली आमदारकी जनतेची प्रश्ने सोडविण्यासाठी पणाला लावली.

चळवळीमध्येच अण्णा व्यस्त असल्यामुळे इकडं कुटुंब सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी ही कुसुमताईंचीच होती. त्यांनीही कोणतीही तक्रार न करत ती जबाबदारी अगदी शेवट पर्यंत सांभाळली. अण्णांच्या पश्चात त्या आपल्या मुलांसाठी बाप आणि आई झाल्या.

सर्व मुलांचा व्यवस्थित सांभाळ केला. त्यांचे शिक्षण पूर्ण केलं. तसेच त्यांना संसाराला सुद्धा लावलं. यातील एक ही जबाबदारी त्यांनी अण्णांवर पडू दिली नाही. उलट अण्णांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात अण्णा गैरहजर होते. अण्णा चळवळीच्या कामानिमित्त बाहेर होते आणि कुसुमताईंनी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं. अण्णांच्या पश्चात त्यांचे मित्र नामदेव कराडकर हे लग्नात वडील म्हणून उभे राहिले.

नागनाथ अण्णा
क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी व सौ. कुसुमताई नायकवडी आपल्या संपूर्ण कुटुंबा समवेत

कुसुमताईंची अण्णांच्या चळवळीला मदत

हुतात्मा किसन अहिर विद्यालयात कुसमताई शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पुढे त्या तेथे मुख्याध्यपिका झाल्या. या नोकरीवरच त्यांनी स्वतःच कुटुंब सांभाळलं. उलट यातूनच अण्णांना जेव्हा चळवळीसाठी आर्थिक मदत लागायची तेव्हा त्या आपल्या कुटुंबाच्या खर्चाला कात्री लावत व ते पैसे अण्णांना देत.

क्रांतिसिंह नाना पाटील अखेरच्या काळात वाळव्यातच होते. नागनाथ अण्णांनी मुलाप्रमाणे त्यांचा शेवटी सांभाळ केला. त्यावेळी नाना पाटील यांच्या आजाराचा सर्व खर्च कुसुमताई यांच्या पगारातूनच करण्यात आला होता.

अण्णांचे कुंटुंबावरील प्रेम

सर्व समाजातील लोक, मुलांवर जस अण्णांचं प्रेम होतं, तसंच प्रेम त्यांनी आपल्या मुलांवर केलं. बाप म्हणून विशेष माया, अधिक प्रेम त्यांनी मुलांना दिलं नाही. तर सर्वाना सामान असंच प्रेम त्यांनी दिलं.

मुलांना नागनाथ अण्णा हे आपले वडील असण्यापेक्षा ते क्रांतिकारक, समाजसुधारक म्हणूनच अधिक माहिती होते. त्यामुळे महाराष्ट्रातील या मोठ्या क्रांतिकार, समाजसुधारक व नेत्याची मुलं अत्यंत सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वाढली. मोठी झाली. म्हणूच आजही अण्णांची पुढची पिढी त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहे.

अधिक वाचा :

नागनाथ अण्णा व कुसुमताईंचा त्यागाचा संसार

अण्णांचा व कुसुमताईंचा हा त्यागाचा संसार असाच शेवटपर्यंत अबाधित होता. या सर्व काळात अण्णा कधीही घरी गेले नाहीत. घरच्या लोकांकडून तशी कुटुंब प्रमुख म्हणून सेवाही करून घेतली नाही. की कुटुंबावर हक्क गाजवला नाही. कुटुंब असून देखील या माणसाने सन्याश्या प्रमाणे जीवन जगले.

क्रांतिमाता लक्ष्मीबाई यांचे निधन झाले तसेच जेव्हा अण्णांचा दुसरा मुलगा अरुण यांचे निधन झाले तेव्हा अण्णा घराच्या दारात जाऊन फक्त दोघांचे प्रेत घेऊन आले होते. पण, ते घरात गेले नाहीत.

नागनाथ अण्णा
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी याच्यासोबत तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

वाळव्यात येण्यासाठी प्रतिभाताईंची अट

राष्ट्रपती प्रतिभाताई व अण्णांची जुनी ओळख होती. अण्णांचं क्रांतिकारी काम आणि समाजासाठी केलेला त्याग याची त्यांना जाणीव होती. शिवाय अण्णा जेव्हा १९८५ मध्ये आमदार होते तेव्हा प्रतिभाताई देखील कॅबिनेट मंत्री होत्या. त्यांनी विधानसभेत एकत्र काम केलं होतं. त्याचं बहीण भावाप्रमाणे नातं होतं. यामुळे अण्णांची प्रत्येक वैयक्तिक गोष्ट प्रतिभाताई यांना माहित होती.

म्हणूनच त्यांनी अण्णा जर स्वतः च्या घरी येणार असतील तर मी वाळव्यात येईन अशी अट प्रतिभाताईंनी शिष्टमंडळाला घातली. शिष्ट मंडळाने सांगितले की तुम्ही वाळव्यात आलात आणि तुम्ही जर अण्णांना विनंती केलीत तर अण्णा तुमच्या विनंतीला मान देऊन नक्कीच घरी येतील.

अण्णांनी चाळीस वर्षांनी स्वत:च्या घराची चढली पायरी

ठरल्या प्रमाणे राष्ट्रपती प्रतिभाताई वाळव्यात आल्या. १९ फेब्रुवारी २००९ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झाले. पद्मभूषण प्राप्त झालेल्या नागनाथ अण्णांचा व कुसुमताईंचा राष्ट्रपतींच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अण्णांकडे आग्रह धरला की, मला तुमच्या घरी यायचं आहे आणि तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन जाणार आहात. आता दस्तूर खुद्द राष्ट्रपतीनींच अण्णांना स्वत:च्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरला म्हटल्यावर अण्णांनी त्यांच्या विनंतीस मान दिला.

नागनाथ अण्णा राष्ट्रपतींना घरी घेऊन आले. राष्ट्रपतींच्या निमित्ताने चाळीस वर्षांच्या वनवासानंतर नागनाथ अण्णांनी आपल्या घराची पायरी चढली. जणू काही तपश्चर्या केल्याप्रमाणे अण्णांनी घरी न जाण्याचे व्रत केले होते. त्यादिवशी घरच्यांना आपल्या घरी राष्ट्रपती आल्याने नव्हे तर खुद्द अण्णा घरी आल्याने अधिक आनंद झाला होता.

हे देखिल वाचले का ?

Back to top button