Bhai Vs zishan : भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी वाद मिटेना | पुढारी

Bhai Vs zishan : भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी वाद मिटेना

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना मुंबई काँग्रेसमध्ये (Bhai Vs zishan) खदखद सुरू झाली आहे. मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि आमदार झिशान सिद्दीकी या दोघांमध्ये दुसऱ्यांदा चकमक उडाली आहे. या दोघांमधील वाद ही मुंबई काँग्रेससाठी डोकेदुखी झाली आहे.

आपल्या मतदार संघात होणाऱ्या मुंबई काँग्रेसच्या कार्यक्रमात आपल्याला डावलले जाते, अशी तक्रार काही महिन्यांपूर्वी सिद्दीकी यांनी केली होती. जगताप यांच्या सांगण्यावरून हा प्रकार झाल्याचा दावा करत त्यांनी थेट सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर आमच्यात काही वाद नाही, असा खुलासा जगताप यांनी केला होता.

हा वाद ताजा असतानाच दोनच दिवसांपूर्वी पार पडलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदयात्रेच्या निमित्ताने या दोघांमध्ये पुन्हा वाद झडला होता. राजगृह येथून पदयात्रेला सुरुवात झाली. तेव्हा सिद्दीकी यांना राजगृहात प्रवेश नाकारला होता. राजगृहात प्रवेश करण्यासाठी ज्या १० नेत्यांची-पदाधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली, त्या यादीत सिद्दीकी यांना डावलण्यात आले होते.

राजगृहाने मंजूर केलेल्या यादीत तुमच्या नावाचा समावेश नाही, असे जगताप यांनी सिद्दीकी यांना सांगितले. परिणामी त्यांना राजगृहात प्रवेश मिळू शकला नव्हता. त्यामुळे सिद्दीकी संतप्त झाले होते. या मुद्द्यावर त्यांचा जगताप यांच्याशी खटका उडून बाचाबाचीही झाली होती.

प्रकाश आंबेडकर आणि आमच्या कुटुंबाचे वैयक्तिक संबंध असून यादी राजगृहाच्या वतीने तयार करण्यात आली नव्हती, अशी माझी माहिती आहे. मला राजगृहात प्रवेश करण्यापासून जगताप यांनी हेतुपुरस्सर मज्जाव केला, असा आरोप सिद्दीकी यांनी केला होता. या आरोपाचे जगताप यांनी खंडन केले होते. या दोघांमधील वादामुळे पदयात्रेच्या वेळी काही क्षण तणावाचे वातावरण होते. सलग दुसऱ्यांदा जगताप आणि सिद्दीकी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

झिशान काय म्हणाले?

झिशान यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी (Bhai Vs zishan) भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी वाद मिटेना यांना पत्र पाठवून जगताप यांच्या विरोधात तक्रार केली आहे. मात्र, हा पक्षाच्या अंतर्गत मामला असल्याने पत्राची प्रत जाहीर करू शकत नाही, असे ते म्हणाले. यापूर्वीही त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून तक्रार केली होती. परंतु या तक्रारीची दखल घेतल्याचे दिसत नाही.

Back to top button