देशाच्या नजरा पुण्याकडे…डीआरडीओचा शास्त्रज्ञ कुरुलकरला पाहण्यासाठी गर्दी | पुढारी

देशाच्या नजरा पुण्याकडे...डीआरडीओचा शास्त्रज्ञ कुरुलकरला पाहण्यासाठी गर्दी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मंगळवारी दुपारी 3.30 ची वेळ… सत्र न्यायालयात पुकारा झाला… प्रदीप हाजीर हो… मग पोलिसांनी कडोकोट बंदोबस्तात डीआरडीओचा शास्त्रज्ञ व संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात हजर केले. युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायालयात इतकी गर्दी झाली की तेथे पाय ठेवायलाही जागा नव्हती.
पुणे सत्र न्यायालयाचा पत्ता शोधत देशभरातील प्रसारमाध्यमांसह वाहिन्यांचे प्रतिनिधी आले होते. तसेच न्यायालयात खालच्या मजल्यापासून वरपर्यंत सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात होता. पहिल्या मजल्यावर कोर्ट रूम नंबर चारमध्ये कुरुलकर याला पोलिसांनी आणले तेव्हा न्यायालयाची खोली गर्दीने खचाखच भरून गेली होती. न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी कामकाज सुरू केले. तेव्हा आरोपीचे वकील, एटीएसच्या महिला तपास अधिकारी व सरकारी वकील समोर उभे होते.

मराठीतच झाला युक्तिवाद…
सरकारी वकील विजय फरगडे यांनी मराठीत युक्तिवाद केला, की यात कुरुलकर यांनी कोणा कोणाला ई-मेलव्दारे संपर्क केला. कोणत्या देशात ते सरकारी पारपत्र वापरून गेले. तसेच, त्यांच्या खात्यावर झालेले व्यवहार तपासण्यासाठी आणखी कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. हा युक्तिवाद सुमारे पाऊणतास सुरू होता. कुरुलकरचे वकील ऋषीकेश गानू यांनी बाजू मांडताना सांगितले, की सर्वच कागदपत्रे सरकारकडे असल्याने त्यासाठी जो तपास करावयाचा आहे तो करावा. तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे नमूद केले.

जिवाचे कान करून युक्तिवाद ऐकला…
सुरुवातीला एटीएसच्या तपास अधिकारी न्यायालयासमोर बोलण्यास उभ्या राहिल्या. त्या नेमक्या काय बोलत आहेत, हे जिवाचे कान करून प्रत्येक जण ऐकण्यास उत्सुक होता. मात्र, दाटीवाटी इतकी झाली होती, की त्यांचा संवाद ऐकू येत नव्हता.अशा वातावरणातच
दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला.

दुसर्‍या दरवाज्याने नेले बाहेर..
गर्दीतल्या प्रत्येकाला युक्तिवाद काय होतो, न्यायालयाने काय सुनावले, याच्यासह कुरुलकर विषयी उत्सुकता होती. पोलिसांवरही गर्दीमुळे प्रचंड तणाव आला होता. ते न्यायालयाच्या बाहेर उभे होते. त्यामुळे सुनावणी संपताच कुरुलकरला दुसर्‍या बाजूने क्षणार्धात पोलिसांनी बाहेर नेत गाडीत नेऊन बसवले. त्यामुळे गर्दी करून लोक बाहेर पळतच आले, पण
तोवर गाडी वेगाने निघून गेली होती.

न्यायालयात फक्त कुरुलकरचीच चर्चा..
देशभरातून आलेल्या पत्रकारांनी दोन्ही बाजूच्या वकिलांना शोधून काढत त्यांना आवाराच्या बाहेर आणले व न्यायालयात नेमके काय झाले, याचे बाईट घेण्याची स्पर्धा सुरू झाली. आरोपीचे वकील सर्वांना सामोरे गेले. त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागला, मात्र ते शांतपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत होते.

Back to top button