97 वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत ; अंमळनेरला संमेलनाचं आयोजन | पुढारी

97 वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत ; अंमळनेरला संमेलनाचं आयोजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वर्ध्यात झालेल्या संमेलनानंतर 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होईल याची चर्चा साहित्यवर्तुळात सुरू होती. आता साहित्यप्रेमी आणि साहित्यिकांची प्रतीक्षा संपली असून, साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर (जळगाव) येथे आगामी 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून, अंमळनेरला संमेलन आयोजित करण्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषद येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना आगामी साहित्य संमेलनाचे वेध लागले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आगामी 97 व्या साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर केले. या संमेलनासाठी सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना अशा चार ठिकाणांहून निमंत्रणे साहित्य महामंडळाला प्राप्त झाली होती.

महामंडळाच्या स्थळनिवड समितीने औदुंबर आणि अंमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा या संस्थेचे दृक-श्राव्य सादरीकरण पाहिले. दोन वर्षांपूर्वी उदगीर येथे साहित्य संमेलन झाले असल्याने आगामी संमेलनासाठी मराठवाड्यातील जालना या स्थळाचा विचार करण्यात आला नाही, असे साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी सांगितले. संमेलनाचे अध्यक्ष कोण असतील याचीही चर्चा साहित्य वर्तुळात सुरू झाली आहे. बैठकीस अध्यक्षा डॉ. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, सुनीताराजे पवार, डॉ. किरण सगर आणि डॉ. नरेंद्र पाठक या समितीसह प्रकाश पागे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे, प्रकाश गर्गे उपस्थित होते.

साने गुरुजी यांच्या वाङ्मयीन कर्मभूमीत हे संमेलन 50 च्या दशकानंतर पाहिल्यांदाच होत आहे. अंमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकासाची मोठी परंपरा आहे. सर्वांच्या सहकार्याने अंमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहे. संमेलन नक्कीच यशस्वी होईल.
                    – डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ, अंमळनेर

 

Back to top button