जनावरांनाही उष्माघाताचा आहे धोका ! पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजनांची माहिती | पुढारी

जनावरांनाही उष्माघाताचा आहे धोका ! पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजनांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  उष्माघाताचा धोका केवळ मनुष्यांना आहे असे नव्हे, तर जनावरांनाही उष्माघातांचा फटका बसू शकतो. जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशी पार झाल्याने जनावरांना विविध आजारदेखील उद्भवू शकतात. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे आता क्रमप्राप्त झाले आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाने काही सूचना दिल्या आहेत. त्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी केले आहे.

सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना जनावरे चरण्यास सोडावे. मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी द्यावे. बैलांकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. अनेकदा जागेअभावी किंवा अन्य कारणाने जनावरे दुपारच्यावेळी भरउन्हात बांधली जातात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे त्यांना थंड वातावरणात चारा टाकावा. म्हशींना उन्हाळ्यात अधिक त्रास होतो, त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी, अशी माहिती डॉ. विधाटे यांनी दिली.

पशुखाद्यामध्ये मिठाचा वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे तसेच दुधाळ पशुंना संतुलित पशुआहारासोबत खनिज मिश्रणे द्यावेत. चार्‍यामध्ये एकदम बदल करणे टाळावे. योग्य पशुआहार, मुरघासचा वापर, निकृष्ट चार्‍यावर युरिया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यातसुद्धा आवश्यक दुग्ध उत्पादन मिळविणे शक्य आहे. जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषधे द्यावी, त्यांचे नियमितपणे रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

हवामानपूरक गोठे असावेत
हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा. गोठ्याची उंची जास्त असावी जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील. परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत. मुक्त संचार गोठ्याचा अवलंब करावा, असे डॉ. शिवाजी विधाटे यांनी सांगितले.

टोल फ्री क्रमांक
जनावरांना काही त्रास झाल्यास किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभागांचा टोल फ्री क्र. 1800-233-0418 अथवा मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा टोल फ्री क्र. 1962 यावर संपर्क साधावा.

Back to top button