बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी धक्कादायक प्रकार; रॉकेल टाकून महिलेला भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न | पुढारी

बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी धक्कादायक प्रकार; रॉकेल टाकून महिलेला भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न

पुणे : महिलेला फिरायला नेऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध 2018 मध्ये सोलापुरातील पांगरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने महिलेच्या भीमनगर येथील घरात शिरून तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला भरदिवसा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रमजान खलील पटेल (वय 60, नवीन म्हाडा वसाहत, भीमनगर, मुंढवा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर मुंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 18 जानेवारीला सकाळी मुंढव्यातील भीमनगरमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी रमजान पटेल फिर्यादी महिलेच्या ओळखीचा आहे. त्याने 2018 मध्ये फिरायला जाऊ, असे सांगून महिलेला बाहेर नेले. त्यानंतर गैरफायदा घेत त्याने महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने रमजान विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी सोलापूर न्यायालयात खटला सुरू आहे.

दरम्यान, आरोपी रमजान आठ दिवसांपूर्वी फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी कुटुंबासह राहण्यास आला. त्यानंतर त्याने बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेस धमकावण्यास सुरुवात केली. बुधवारी तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पीडिता सुदैवाने बचावली. तिने पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई व वरिष्ठ पोलिस निरीक्षक लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक काकडे तपास करत आहेत.

2013 ते 2017 या काळात आरोपीने खोटे बोलून प्रेम आहे, असे सांगून महिलेवर बलात्कार केल्याचा सोलापूर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तो गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेला आरोपीने रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                            – अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे.

Back to top button