महाराष्ट्र केसरी : सिकंदर शेख, शुभम सिदनाळे उपांत्य फेरीत | पुढारी

महाराष्ट्र केसरी : सिकंदर शेख, शुभम सिदनाळे उपांत्य फेरीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 65 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठीच्या उपांत्य पूर्व फेरीत वाशिमच्या सिकंदर शेख आणि कोल्हापूरच्या शुभम सिदनाळे यांनी माती विभागातून तर हर्षवर्धन सदगीर याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

माती विभागातील महाराष्ट्र केसरीच्या लढतीच्या उपांत्यपूर्व फेरीत वाशिमच्या सिकंदर शेख याने मुंबई उपनगरच्या विशाल बनकर याचा 10- 0 असा तांत्रिक गुणांवर पराभव करीत विजय मिळवला. ही लढत पहिल्या सेकंदापासूनच रंगली. सिकंदरने दुहेरी काढत पहिल्या 15 सेकंदातच 2 गुण मिळवित आगेकूच केली. त्यानंतर पुन्हा दुहेरी पटाबरोबरच भारंदाज डावावर आणखीन 4 गुण मिळवीत 6 – 0 आघाडी मिळवली. सिकंदरने आक्रमकता कायम ठेवत टांग लावण्याचा प्रयत्न केला आणि हप्ता डावावर 4 गुण मिळवीत 10- 0 अशी कुस्ती जिंकली.

सांगलीच्या संदीप मोटे याचा कोल्हापूरच्या शुभम सिदनाळे याने 3 – 0 च्या तांत्रिक गुणांवर पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिसर्‍या लढतीत माजी उपमहाराष्ट्र केसरी लातूरचा पैलवान शैलेश शेळके पराभूत झाला. त्याला सोलापूरचा महेंद्र गायकवाड माती विभागातून 5 – 2 अशा गुणांच्या फरकाने पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सोनबा गोंगाणे, आकाश देशमुख, रविराज चव्हाण, सौरभ जाधव, कालीचरण सोनवलकर वजनी गटातून अंतिम फेरीत धडक गादी विभागाच्या झालेल्या 65 किलो वजनी गटातील पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरचा आंतरराष्ट्रीय मल्ल सोनबा गोंगाणे याला कोल्हापूरच्या शुभम पाटीलने चांगलेच झुंजविले होते. मात्र, अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असलेल्या सोनबा याने शुभम पाटीलवर 3-2 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

तर दुसर्‍या उपांत्य फेरीच्या लढतीत पुणे जिल्ह्याच्या केतन घारे याने तर अवघ्या अर्ध्या मिनिटात सोलापूरच्या तुषार देशमुखचा 10-0 अशा फरकाने एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. 74 किलोच्या उपांत्य फेरीत लातूरच्या आकाश देशमुखने अहमदनगरच्या महेश फुलमाळीचा 8-7 ने तर सोलापूरच्या रविराज चव्हाणने पुणे शहरच्या शुभम थोरातचा 9-2 अशा फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

92 किलोच्या उपांत्य फेरीत पिंपरी-चिंचवडच्या सौरभ जाधवने ठाण्याच्या धनंजय पाटीलचा 4-1, तर सोलापूरच्या कालीचरण सोनवलकरने परभणीच्या जयजीत गितेला 12-1 अशा फरकाने एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचप्रमाणे माती विभागातील 65 किलोच्या उपांत्य फेरीत पुण्याचा आंतरराष्ट्रीय युवा मल्ल सूरज कोकाटे याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत कोल्हापूरच्या कुलदीप पवारला चारीमुंड्या चितपट करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसर्‍या सेमीफायनलच्या लढतीत लातूरचा राष्ट्रीय मल्ल पंकज पवार आणि सोलापूरच्या अनिकेत मगरचे 6-6 असे समान गुण झाले होते. मात्र सुपर टेक्निक (उच्च कलात्मक) आधारे विजय झाल्याने अंतिम फेरीत प्रवेश केला.

74 किलोच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या साताप्पा हिरगुडेने पुण्याच्या शिवाजी टकलेला चारीमुंड्या चितपट करून अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसर्‍या उपांत्य लढतीत सांगलीच्या श्रीकांत निकमने अहमदनगरच्या ऋषिकेश शेळकेचा 8-5 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला 92 किलोच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या श्रीनिवास पाथरुटने कोल्हापूरच्या रोहन रंडे याचा 10-0 असा तर पुणे जिल्ह्याच्या बाबासाहेब तरंगे याने नाशिकच्या रोहन परदेशीचा 11-0 अशा गुणाधिक्यांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

महाराष्ट्र केसरी लढतीची सायंकाळी उशिरा सुरुवात
महाराष्ट्र केसरी किताबाच्या दोन्ही विभागांतील कुस्त्या सायंकाळी उशिरा होणार आहेत. असे असले तरी कुस्तीशौकिनांनी दुपारी तीन वाजल्यापासून स्टेडियममध्ये आपली हजेरी लावली. लढती व्यवस्थितपणे पाहता याव्यात यासाठी स्टेडियममधील मोक्याच्या जागा पकडण्यासाठी लढतींना सुरुवात होण्यापूर्वीच गर्दी केली होती. पुढील लढती या महाराष्ट्राचा नवीन ‘केसरी’ ठरविणार आहेत.

Back to top button