दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आत्मचिंतनाची गरज; ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष पिछाडीवर | पुढारी

दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आत्मचिंतनाची गरज; ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष पिछाडीवर

उमेश कुलकर्णी

दौंड : दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज आहे. दौंड तालुका हा पूर्वीपासून शरद पवार यांचा बालेकिल्ला. परंतु, या बालेकिल्ल्यातच मागील काही वर्षांपासून हळूहळू भाजपने सुरुंग लावायला सुरुवात केली आहे, याची चुणूक नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला गटबाजीने ग्रासले आहे, याकडे बारामतीकरांचे लक्ष नाही व दौंडचा विकास मागील काही वर्षांपासून म्हणावा तसा राहिलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दौंड शहरात काही लोकांच्या मालकीचा झाला असल्याचे चित्र पाहायला मिळते फक्त नेते आले की मोजके दहा-पंधरा लोक त्यांच्याबरोबर तेवढ्या कार्यक्रमापुरते दिसतात व एकदा का नेत्यांनी पाठ फिरवली की हे नेते गायब होतात असे सध्याचे चित्र आहे. सध्या निवडणुकीचा काळ असून, आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दौंड शहरातील प्रत्येक राजकीय पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे, त्यामुळे येणार्‍या काळात फोडाफोडीचे राजकारण नक्कीच होईल, यात मात्र शंका नाही. दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर पक्ष एकसंघ ठेवणे गरजेचे आहे.

बारामतीच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले, तर आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल हे मात्र निश्चित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व त्यांच्या पदाधिकारी नेत्यांनी मागील दहा वर्षांमध्ये पक्ष वाढविण्याकरिता कोणती पावले उचलली काय, काय उपाययोजना केल्या, पक्षाच्या हिताचे काय केले, याचा लेखाजोखा वरिष्ठांनी मागून घेऊन त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

नाहीतर, नेते एका पक्षात, कार्यकर्ते दुसर्‍या पक्षात असेदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. बारामतीच्या नेत्यांनी आगामी काळात सुस्त पडलेल्या नेत्यांची झाडाझडती केली नाही, तर त्याची किंमत त्यांनाच मोजावी लागेल, असे चित्र सध्यातरी आहे.

मंडळ आणि आघाडी आव्हान ठरतील
आगामी काळात नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीला नागरी हित संरक्षण मंडळ, दौंड शहर विकास आघाडी मोठ्या प्रमाणात आव्हान देऊ शकते, असेतरी सध्याचे चित्र आहे.

भाजपही राष्ट्रवादीच्या मार्गावर
भारतीय जनता पक्षाचेही ठराविकच कार्यकर्ते दौंड शहराच्या काही कार्यक्रमांमध्ये तेवढ्यापुरते दिसतात, त्यामुळे पक्षाच्या शहरातील विस्ताराला मर्यादा आल्या आहेत. दौंड शहरात पक्षवाढीसाठी कोणतीही ठोस अशी कामगिरी केलेले नाही. मागील पाच वर्षांत पक्षाचे किती नवीन सभासद झाले, पक्षाचे ध्येयधोरणे राबविण्यामध्ये कोणकोणत्या बड्या नेत्यांनी पुढाकार घेतला याचा लेखाजोखा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेणे गरजेचे आहे.

गळकी कुरकुंभ मोरी आली नशिबाला
सर्वपक्षीय नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे दौंड शहराचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. सर्वच पक्षांचे नेते अनेक दिवसांपासून दौंडच्या तिसर्‍या कुरकुंभ मोरीवर तोंडसुख घेत होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. परंतु, मागील दोन-अडीच महिन्यांपासून कोणत्याही उद्घाटनाविना बिनबोभाट कुरकुंभ मोरी रेल्वे प्रशासनाने सुरू केली. दौंडकरांच्या नशिबी नवीन झालेली कुरकुंभ मोरीदेखील अनेक ठिकाणी गळतीचीच असल्याचे चित्र पाहायला मिळते. ही मोरी होत असताना राष्ट्रवादी पक्षाचे काही नेते जसे काय आपण या कामावर सुपरवायझर आहोत असे वावरत होते.

परंतु, कुरकुंभ मोरी चालू झाली व या कुरकुंभ मोरीमध्ये अनेक ठिकाणी गटाराचे पाणी येतेच हे पाहून सत्ताधारी व विरोधक यांची बोलती बंद झाली आहे. ’तेरीभी चूप मेरीभी चूप’ असे चित्र आहे. दौंडकरांच्या नशिबी शेवटी काहीही झाले, तरी गटारीच्या पाण्यातून ये-जा करावी लागणार हे मात्र निश्चित झाले आहे.तिसर्‍या कुरकुंभ मोरीऐवजी जर उड्डाणपूल केला असता, तर हे सगळे प्रश्न सुटले असते.

परंतु, राजकीय नेत्यांना काही घेणे-देणे नाही. कुरकुंभ मोरीपुढील जी दुकाने आहेत ती दुसर्‍या जागेत स्थलांतरित करावी यावर अनेकदा चर्चा झाली. परंतु, मोरी चालू झाली आणि सगळेच नेते चिडीचूप झाले. यामागचे गौडबंगाल काय हे कळायला मार्ग नाही.जे नेते दौंड शहराला भेट देऊन गेले व कुरकुंभ मोरीबद्दल मोठी आश्वासने दिली, त्यांनी मात्र आता येथे पाठ केल्याचे चित्र आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा-कराड व सातारा-शिरवळ या रस्त्यावर

Back to top button