रामचंद्र देखणे : अधिक देखणे तरी निरंजन पाहणे… | पुढारी

रामचंद्र देखणे : अधिक देखणे तरी निरंजन पाहणे...

सुनील माळी, निवासी संपादक, पुढारी, पुणे  – 

माझ्यासह तुमच्यातील बरेच जण या जगातून निघून जातील, तेव्हा
तुमच्या-माझ्या कुटुंबाचं नुकसान होईल (अल्पकाळ का होईना)…, पण देखणे
निघून गेल्यानं त्यांच्या कुटुंबाचं तर नुकसान झालंच आहे, पण
महाराष्ट्रमंडळाच्या लोककलेचं, संत साहित्याच्या निरूपणाचं,
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचं नुकसान झालंय…

जायचं तर सगळ्यांनाच आहे, देखणे काही अमृत पिऊन हजार वर्ष जगायला आलेले
नव्हते, मग नुकसान कसे ? असं पाहा. देखणे फक्त ६७ वर्षांचे होते. आणखी
किमान दहा-बारा वर्षे त्यांच्या हातून आणखी बरच काही लिहिलं गेलं असतं.
पुस्तकांच्या संख्येने आता पन्नाशी गाठलीये ती शंभरपऱ्यंत गेली असती.
त्यांच्या बहारदार भारूडांनी आतापऱ्यंत लाखो मराठी मनांचं पोषण केलं
होतं, पुढच्या दहा-बारा वर्षांत पुढच्या पिढ्यांमधील आणखी काही लाख
तरूणांपऱ्यंत ही लोककला, लोकसाहित्य अन त्याचं मर्म पोहोचलं असतं.
त्यामुळं चटका त्यांच्या जाण्याचा नाही तर त्यांच्या अवेळी जाण्याचा आहे.

देखणे मला पहिल्यांदा भेटले ते पिंपरी प्राधिकरणाच्या काऱ्यालयात. तो
अंदाजे १९९०-९१ चा सुमार असावा. तिथं ते जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत
होते. पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येला चांगली घरं देण्याचं,
सुनियोजित नगर वसवण्याचं काम प्राधिकरणाकडं होतं आणि हे काम योग्यरित्या
चाललं आहे का नाही ?, प्राधिकरणाची पुढची पावलं कशी पडणार आहेत ?, याचं
वृत्तांकन बातमीदार या नात्यानं करण्याचं काम माझ्याकडं होतं.
प्राधिकरणाची माहिती न दडवता ते सांगत. त्यांचा स्नेह नंतर वाढत गेला अन
त्यांतून त्यांच्यातील साहित्यिक, भारूडकाराची ओळख झाली. पुढं
जेव्हाजेव्हा आध्यात्मिक संदर्भ लागत किंवा पालख्यांसारख्या औचित्यावेळी
प्रासंगिक लेख हवे असत, तेव्हातेव्हा त्यांची हटकून आठवण येई. त्यांच्या
लोककलांच्या काऱ्यक्रमांमधून शिकायला मिळे. त्या काऱ्यक्रमाची सुरूवात ते
वासुदेव-बहुरूपी-पांगळा अशा सर्वांच्या आठवणीनं जोरकसरित्या करीत आणि
काऱ्यक्रमात चैतन्य येई. पत्रकारितेत असल्यानं काही काऱ्यक्रमांत
त्यांच्या शेजारी व्यासपीठावर बसावं लागे, तेव्हा खूपच संकोच वाटे, पण
आपल्या विद्वत्तेचा तोरा कधीही त्यांच्या वागण्यात नसायचा. पाणी उथळ
नसल्यानं खळखळाट नव्हताच. ते प्रत्येकाशी आदरानं, प्रेमानं बोलत.

देखणे सरांच्या एका काऱ्यक्रमाला त्यांनी देशभरात ख्यातकिर्त असलेल्या
एका आध्यात्मिक व्यक्तीला आमंत्रित केलं होतं. ”काऱ्यक्रमाला जरूर या”,
या त्यांच्या तोंडभरून दिलेल्या आमंत्रणामुळं काऱ्यक्रमाच्या आधीच
पोहोचलो. ग्रीन रूममध्ये सुरू असलेल्या गप्पा ऐकल्या. ”देशभरात या
विषयावर माझ्याशिवाय अधिकारवाणीनं कुणीच बोलू शकणार नाही,” असं वाक्य
त्या पाहुण्यांच्या तोंडून निघून गेलं. त्यावर देखणे सर फक्त हसले.
काऱ्यक्रमानंतर एक-दोन दिवसांनी त्यांना मी फोन केला अन म्हटलं, ”सर,
मडकं कच्चंच आहे का अजून ?…” सर फोनवरही फक्त हसले. त्यांच्या तोंडून
कुणाही बाबतचा उणा शब्द कधीच बाहेर पडला नव्हता आणि माझ्या विचारण्यानंही
त्यांच्या त्या व्रताला बाधा आली नव्हती…

देखणे सरांचं हृदयाचं ऑपरेशन झालं, तरी त्यांचे दौरे-व्याख्यानं सुरूच
होती. हालचाली थोड्या मंदावल्या होत्या. त्यांची भेट झाली की मी त्यांना
म्हणे, ”सर, आता फार दगदग करू नका…” हसून ते होकार देत, पण त्यांचे
दौरे सुरूच राहिले. दोन-तीन वर्षांपूर्वीच्या एका गणपतीत बुधवारातल्या
पियुष शहाच्या साईनाथ मंडळात सर भेटले. ते तिथून घरी जाणार होते. त्यांना
म्हटलं ”कसबा गणपतीला येता का ?.” त्यांनी होकार भरला आणि त्यांचा हात
धरून कसब्यात गेलो. ”तुमच्यामुळं दर्शन झालं” या त्यांच्या कौतुकानं
आणखी संकोचलो. त्यांना घरी पोचवण्याची व्यवस्था लावली. थोड्या वेळानं सर
नीट पोचल्याचा घरच्यांचा फोन आला.

दर दिवाळीला माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओवीचा समावेश असलेलं
भेटकार्ड सर हटकून पाठवतं… मी त्यांना म्हणे, ”अनेक ओव्यांचे,
अभंगांचे भावार्थ तुमच्याकडून समजून घ्यायचेत. एकदा तुमची वेळ घेऊन
येतो.” ते मनापासून बोलावत, पण कामाच्या धबडग्यात मनातली ती इच्छा तशीच
राहून गेलीये.

…अगदी कालच, घटस्थापनेच्या दिवशी ‘पुढारी’चा काऱ्यक्रम होता,
काऱ्यक्रमाचा संयोजक असलेल्या किरण जोशी या माझ्या सहकाऱ्याचा फोन आला,
”काऱ्यक्रमाला प्रमुख पाहुणा कोणाला बोलवायचं ?” मी देखणे सरांचं नाव
सुचवलं… किरणनं त्यांना फोन केला… त्यावर त्यांनी ”माझा दुसरा
काऱ्यक्रम ठरलाय,” असं सांगत त्याला नम्रपणानं नकार दिला… आणि त्याच
रात्री त्याच काऱ्यक्रमाहून परतत असताना मला माझी सहकारी सुवर्णाचा फोन
आला… ”देखणे सर गेले…”

सरांनी दुसरा ठरवलेला काऱ्यक्रम या जगातला नव्हता तर…

‘मरण हा तो चुकेना, देह वाचविता वाचेना…’ हे खरंय, पण येणारं मरण कसं
यावं ? आयसीयुमध्ये नाकातोंड्यात नळ्या कोंबून असलेल्या स्थितीत,
‘व्हेंटिलेटर कधी काढायचा’ याचा नातलगांमध्ये बराच खल झाल्यानंतर
निघालेल्या व्हेंटिलेटरच्या स्थितीत ? बाथरूममध्ये घसरून बेशुद्ध
पडल्यावर ?… शरीराची अजिबात हालचाल करता येत नसलेल्या विकलांग अवस्थेत
?… का आणखी कशातरी भयावह पद्धतीनं ?…

या पैकी कोणत्याही कष्टप्रदरित्या देखणे सरांना मरण आलं नाही. त्यांना
मरण आलं ते त्या विश्वात्मक शक्तीची, म्हणजेच माऊलींनी वर्णन केलेल्या
त्या चैतन्याची आराधना करताना. घटस्थापनेच्या दिवशी त्यांची सून स्तोत्र
म्हणत होती. सरांनी नातवाला टाळ आणून दिला. नातू टाळ वाजवत होता तर
सरांनी टाळ्यांनी ताल धरला होता. संत साहित्य निरूपणाच्या, भारूडादी
लोककला सादरीकरणाच्या, प्रासादिक व्याख्यानांच्या, अनेक दशके केलेल्या
आषाढी वारी साधनेच्या सरांनी मांडलेल्या यज्ञानं तोषवून त्या विश्वात्मक
देवानं त्यांना पसाय म्हणजे प्रसादाचं दान दिलं… त्यांना भावसमाधीचं
खेव दिलं. ‘देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी, तेणे समाधान मज जोडले ओ
माये…’ शरीर जीर्ण होतं-नष्ट होतं, पण नष्ट होत नाही आत्मा. तो
शस्त्रानंही कापता येत नाही तो अमर आहे, त्यामुळं आपलं कर्तव्य निष्काम
भावानं करत असताना अंतऱ्यामी कायम त्या परमात्म्याशी असलेली एकरूपता
इंद्रियांचा वापर न करता अनुभवावी, हा श्रीकृष्णाचा मूळ संस्कृतातला
संदेश खेडोपाड्यातल्या निरक्षर बायाबापड्यांपऱ्यंत अमृतातेही पैजा
जिंकणाऱ्या मऱ्हाटीच्या तत्कालिन बोली भाषेत पोचवणाऱ्या ज्ञानदेवांनी
समाधी अवस्था वर्णन केली. त्या उपदेशानं भारलेल्या देखणे सरांचं निधन
नाही झालं, त्यांना भावसमाधी लागली. ‘पुरे पुरे आता प्रपंच पाहणे,
निजानंदी राहणे स्वरुपी ओ माये,’ या ज्ञानदेवांच्या भावावस्थेशी त्यांची
जवळिक झाल्यानं त्यांनी हा ऐहिक प्रपंच सोडला अन ब्रह्मस्वरूपी विलिन
झाले…
… ही अवस्था शब्दातीत आहे…

Back to top button