म्हाडासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ | पुढारी

म्हाडासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध योजनेतील 5 हजार 68 सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता सोडत 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिली. पुणे म्हाडा विभागातर्फे जून महिन्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए परिसर, कोल्हापूर आणि सांगली परिसरासाठी तब्बल साडेपाच हजारांपेक्षा अधिक सदनिका आणि मोकळया भूखंडांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

मात्र, नवीन एकत्रिकृत बांधकाम नियमन प्रणालीनुसार (युडीसीपीआर) उत्पंन्न मर्यादेत नियम लादण्यात आल्याने सुरवातीच्या आठवड्यात अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला, मात्र मंत्रालयीन स्तरावर पुन्हा उत्पंन्न मर्यादेच्या नियमांना शिथिलता दिल्याने दोन दिवस ऑनलाईन अर्ज प्रणाली बंद करण्यात आली होती. लॉटरी सोडत पद्धत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने पुन्हा दोन ते तीन दिवस ऑनलाईन प्रणाली बंद करण्यात आली. मात्र त्यानंतर उत्पंन्न मर्यादेची अट शिथिल केल्याने अर्ज येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार इच्छुकांना अर्ज भरण्यासाठीचा कालावधी वाढवून देण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली.

  • इच्छुकांना 31 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार 
  • 1 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार
  • 3 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पैसे भरण्याची मुदत
  • 18 ऑगस्ट रोजी ऑनलाईन सोडत जाहीर होणार

Back to top button