भाजपचा ‘४५ प्लस’चा आकडा हा संपूर्ण देशाचा : उद्धव ठाकरे | पुढारी

भाजपचा ‘४५ प्लस’चा आकडा हा संपूर्ण देशाचा : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व 48 जागा जिंकणार आहे. भाजपचा ‘45 प्लस’चा आकडा हा संपूर्ण देशाचा असल्याचा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेले चालत नाही. ते विरोधी पक्षांना भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी इकडे तिकडे फिरत आहेत. कुठे कुठे भ्रष्टाचारी आहेत ते पाहून मोदींचा व्हॅक्यूम क्लीनर फिरतोय. सर्व भ्रष्टाचारी भाजपत घेत आहेत, असा हल्लाही त्यांनी केला.

शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या मशाल या अधिकृत चिन्हाचे व नव्या गीताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक रोखे घोटाळ्यामुळे भाजपचे बिंग फुटले आहे. हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला यांनी त्याला ‘मोदी गेट’ असे नाव दिले आहे, म्हणजेच जगातील सर्वांत मोठा घोटाळा. याचा सर्वोच्च न्यायालयात पर्दाफाश झाला नसता तर भाजपला हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिले हे कळलेच नसते, असे ठाकरे म्हणाले.

बंडखोरी त्या-त्या पक्षाने थांबवावी

सांगलीत विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरूनही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. संपूर्ण देशात हुकूमशाहीविरोधात जनमत तयार झाले आहे. सर्व पक्षांचे जागावाटप पूर्ण झालेले आहे. तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केले आहे. त्यामुळे आता कुठे बंडखोरी किंवा गद्दारी होत असेल तर त्या-त्या पक्षाने जबाबदारीने थांबवावी, असे मत व्यक्त करत बंडखोरी कुठे झाली तर जनता आता त्यांना स्थान देणार नाही, असेही ठाकरेंनी सुनावले.

Back to top button