‘तुतारी’वर लढणार नाही : आ. पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

‘तुतारी’वर लढणार नाही : आ. पृथ्वीराज चव्हाण

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या कर्मभूमीत जातीयवादी विचार येणार नाही, यासाठी शरद पवार व आम्ही कटिबद्ध आहोत. मतदारसंघातून भाजपला रोखणारा सक्षम उमेदवार असावा, अशी भावना आमची आहे. शेवटी उमेदवार निवडीचा निर्णय त्यांचा आहे. तरीही मतदारसंघ लढवण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडे आल्यास त्यावर विचार करू. काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर लढू. मात्र, तुतारी चिन्हावर लढणार नाही. पर्याय काढून आदेश दिला तर माझी तयारी असल्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, रजनी पवार, धनश्री महाडिक, राजेंद्र शेलार उपस्थित होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी काँग्रेस कमिटीत पत्रकारांबरोबर बोलण्यापूर्वी सातार्‍यात अरूण गोडबोले, साहेबराव पवार व सुजीत आंबेकर या कुटुंबाशी ऋणानुबंध असल्याने संवाद साधला.

आ. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीत यामधील बहुतांश मतदारसंघाचे निर्णय झाले आहेत. सर्वांचे एकमत झाले असून दोन-तीन ठिकाणांबाबत काही चर्चाही सुरू आहे. सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाकडे असल्याचे स्पष्ट आहे. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असावा याविषयीही चर्चा होत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची व माझी काल कराड येथेही भेट झाली. मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच असल्याने शरद पवार यांनीच उमेदवाराबाबत निर्णय घ्यायचा आहे. फक्त भाजपला रोखून ठेवणारा सक्षम उमेदवार असावा ही आमची भावना आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार आहोत.

सातारा मतदारसंघातून आपण इच्छुक आहात का? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी मतदारसंघ काँग्रेसने लढवावा असा प्रस्ताव अद्याप आला नाही. तसा प्रस्ताव आल्यास त्याबाबत विचार करण्यात येईल. पण, आतापर्यंत तरी तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असे स्पष्ट केले. तसेच या निवडणुकीत ताकदीने लढले पाहिजे असे सांगून काही अंदाज वर्तवले जातात. मी राष्ट्रवादीचे तुतारी चिन्ह घेईन का? पण, ते आता शक्य नाही. मी काँग्रेस पक्षाचेच काम करत राहणार. जर त्यांनी यामध्ये काही पर्याय काढला. मला सांगितलं, आदेश दिला तर माझी निवडणुकीची तयारी आहे, अशी अनुकुलताही त्यांनी यावेळी दर्शवली.

दोन दिवसांत महाविकास आघाडीचा उमेदवार

सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. याबाबत खा. शरद पवार जो उमेदवार देतील त्याचे काम आम्ही करणार आहोत. काही जागांचा तिढा महाविकास आघाडीत असला, तरी त्यावर लवकर तोडगा निघेल, तर सातारा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव हे दोन दिवसात निश्चित होईल, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Back to top button