वेध लोकसभेचे : तत्वनिष्ठ राजकारणी! | पुढारी

वेध लोकसभेचे : तत्वनिष्ठ राजकारणी!

उमेश काळे

१९७७ च्या निवडणुकीत बीड मतदारसंघातून माकपचे गंगाधर अप्पा बुरांडे निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे लक्ष्मणराव देशमुख यांचा ५१ हजार मतांनी पराभव केला. १९६७ ला क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्यानंतर ही जागा काँग्रेसकडून पुन्हा हिसकावून घेण्यात कम्युनिस्टांना यश आले. बुरांडे यांना अप्पा या नावाने सगळेजण ओळखत असत. बीड जिल्ह्यातील मोहा (ता. परळी) येथील रहिवासी असणार्‍या अप्पांना अडीच वर्ष खासदारकी मिळाली. पण पक्षनिष्ठेचा आदर्श त्यांनी सर्वच राजकीय पक्षांसमोर प्रस्थापित केला.

बुरांडे यांचे जीवन संघर्षमय होते. अंबाजोगाई, नांदेड, हैदराबाद येथे शिक्षण पूर्ण करणार्‍या अप्पांनी रझाकारी राजवटीविरोधात संघर्ष केला. १९४२ मध्ये अंबाजोगाई येथे असणारे निझामाचे रेडिओ स्टेशन त्यांनी उद्धवस्त केले. १९४६ साली त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम सुरू केले. तेलंगणात कम्युनिस्टांनी किसान चळवळीस प्रारंभ केला. साहजिकच मराठवाड्यात असणार्‍या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनीही चळवळ आपल्या प्रदेशात आणली. अप्पा आणि त्यांचे सहकारी आर. डी. देशपांडे यांनी कंधार तालुक्यातील तेल्की येथे ग्रामराज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते पकडले गेले. पोलिसांनी त्यांना नांदेड, परभणी, निझामाबाद येथील कारागृहात ठेवले. या काळातच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. तसेच त्यांचे जवळचे मित्र वसंतराव राक्षसभुवनकर हे वैजापूर येथे पोलिस गोळीबारात ठार झाले.

वाघ मारला होता…

माकपचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी एका लेखात बुरांडे यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला आहे. मुक्‍ती संग्रामानंतर बुरांडे हे मोहा येथेच राहण्यासाठी आले. मोहा परिसर जंगलाने वेढलेला. या जंगलातील बिबट्या, वाघांचा वावर असे. जंगलातील एक बिबट्या माणसे, जनावरांवर हल्‍ला करीत असल्याने भयाचे वातावरण होते. तेव्हा बुरांडे व रंगनाथ देशमुख हे हातात कुर्‍हाड घेत गस्तीवर असताना अचानक एका वाघाने त्यांच्यावर झडप घातली. वाघ आणि बुरांडे, देशमुख यांचा संघर्ष सुरू झाला. या हल्ल्यात बुरांडे, देशमुख गंभीर जखमी झाले, पण दोघांनीही प्रतिकार केल्यामुळे वाघही जखमी झाला. अखेर एका क्षणी बुरांडे यांनी कुर्‍हाडीचा घाव त्याच्यावर घातला आणि वाघ मरण पावला. ग्रामस्थांना या घटनेची माहिती कळाल्यानंतर त्यांनी मृत वाघाची गावातून मिरवणूक काढली. अप्पांनी केलेल्या संघर्षाचा ग्रामस्थांच्या मनावर दीर्घकाळ प्रभाव राहिला. अप्पा व त्यांच्या मित्राच्या जखमा भरून येण्यास काही दिवस लागले.

मोहा भागात त्यांच्याविषयी असलेल्या आदरामुळे वीस वर्ष सरपंचपदी ते कार्यरत होते. बीड जिल्हा परिषद सदस्य, लोकल बोर्ड सदस्य या नात्याने त्यांनी या भागात विविध योजना आणल्या. महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेज सुरू केले.

मराठवाड्यात पदयात्रा

अप्पांचे संघटनात्मक काम लक्षात राहण्याजोगे आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली माकपने मराठवाड्यात पदयात्रा काढली होती. माकपशी संबंधित किसान सभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. माकपच्या प्रांत स्तरावरील अनेक जबाबदार्‍या त्यांनी सांभाळलया. विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या काळात दलित समाजाची घरे वाचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मराठवाडा विकास आंदोलन, आणीबाणीविरोधी लढ्यात ते सक्रिय होते. अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित त्यांना दिलेली कार त्यांनी क्‍वचितच स्वत:च्या कामासाठी वापरली असेल. त्यांनी निवडणुका लढविताना पक्षच्या विचारधारेशी प्रतारणा केली नाही. निवडणुकीसाठी जमा झालेल्या पैशाचा पै ना पै हिशोब ते ठेवत असत. १ ऑक्टोबर, २००८ ला बुरांडे यांचे निधन झाले. त्यांच्या नावे कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान ही संस्था चालविली जाते. गतवर्षी बुरांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या कामगिरीवर आधारित स्मारकाचे लोकार्पण कॉ. सीताराम येचुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाले.

मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते गोविंदभाई श्रॉफ यांच्या हस्ते गंगाधर अप्पा बुरांडे यांचा अमृतमहोत्सवी सोहळ्यात सत्कार करण्यात आला.

Back to top button