सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
चुकीचा गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी जेलरोडचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना निलंबित केले आहे. एका जागेच्या गुन्ह्यामध्ये चुकीची नोंद केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांवर ही कारवाई करण्यात आली.
सहा महिन्यांकरिता राहण्यासाठी आलेल्या तिघा जणांनी जागा बळकावण्याच्या हेतूने तक्रारदाराला शिवीगाळ करून दमदाटी केली होती. तक्रारदार हे अपंग व मागासवर्गीय असल्याने या प्रकरणांमध्ये कोणतीही चौकशी न करताच ५ एप्रिल रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.
जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी एका जागेच्या गुन्ह्यामध्ये चुकीची कारवाई केली. ते तपासात उघड झाले आहे. यावरून पोलीस दलाची बदनामी झाली आणि जनमानसामध्ये पोलीसांबद्दलची प्रतिमा मलीन झाली, असा ठपका ठेवून पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना पोलीस दलातून निलंबित केले आहे. पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी त्यांच्या सहा महिन्याच्या कार्यकालात अनेक जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यातच आता पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांचीही भर पडली आहे.