कोल्हापूर : छ. शाहू महाराजांमुळे कोल्हापूरची सुवर्णकला जगमान्य | पुढारी

कोल्हापूर : छ. शाहू महाराजांमुळे कोल्हापूरची सुवर्णकला जगमान्य

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी विविध योजना राबविल्या. इतर क्षेत्रांप्रमाणेच पारंपरिक सराफी व्यवसायाला विविध पैलू प्राप्त करून दिले. स्वतंत्र गुजरी निर्माण करून सुवर्णकारांना स्थैर्य दिले. यामुळेच आज कोल्हापूरची सुवर्णकला ही जगमान्य झाली आहे, असे प्रतिपादन शाहू महाराज यांनी केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति-शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘कृतज्ञता पर्वा’चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्यावतीने गुजरी येथे ‘सुवर्णजत्रा’ हे पारंपरिक दागिन्यांचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. 22 ते 24 एप्रिल या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत ते सर्वांसाठी खुले राहणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. राजर्षी शाहू प्रतिमा पूजन, स्वागत कमानीचे अनावरण आणि गोपीनाथ नार्वेकर यांनी तयार केलेल्या राजर्षी शाहूंच्या सोन्याच्या लॉकेटचे लोकार्पणही झाले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, माजी नगरसेवक ईश्वर परमार आदी उपस्थित होते. शिवकालीन युद्धकला व ढोल-ताशा पथकाने मराठमोळे वातावारण निर्माण झाले होते.

दरम्यान यात्रेत पारंपरिक दागिन्यांच्या मजुरीवर 10 ते 30 टक्क्यांपर्यंत सुट देण्यात येणार आहे . यात्रेत कोल्हापुरी साज, ठुशी, शिंदेशाही तोडा, बुगडी अशा विविध पारंपरिक दागिण्यांसह टेम्पल-कुंदन-अँटिक ज्वेलरी यांची विविधता पाहायला मिळणार आहे. संयोजन सचिव प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, संजय रांगोळे, विजय भोसले, अशोक ओसवाल, ललित ओसवाल यांच्यासह सराफ व्यापार्‍यांनी केले. संपूर्ण गुजरी राजर्षी शाहू प्रतिमा व आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. सुवर्ण कारागिरांकडून ग्राहकांचे विशेष आदरातिथ्य केले जात होते.

हेही वाचलतं का?

Back to top button