कराड : संतापजनक...किल्ले वसंतगडला वणवा | पुढारी

कराड : संतापजनक...किल्ले वसंतगडला वणवा

कराड : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले वसंतगड (ता. कराड) येथील उत्तर दिशेच्या बुरूजाकडील बाजूला अज्ञात आग लावली. या आगीत वसंतगड होरपळून निघाला असून वनसंपदा, वन्य प्राण्यांसह सुमारे 15 ते 17 एकर क्षेत्र आगीत भस्मसात झाले आहे. विशेष म्हणजे जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडला असून शुक्रवारी पहाटे चार वाजता टीम वसंतगडला अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जन्मभूमी तळबीड व कराड – पाटण मार्गावरील वसंतगड गावालगत किल्ले वसंतगड आहे. या किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी टीम वसंतगड मागील काही वर्षापासून अथक परिश्रम घेत आहे. एकीकडे टीम वसंतगड किल्ले वसंतगडच्या जतन व संवर्धनासाठी झटत असतानाच किल्ल्याच्या उत्तर दिशेच्या बुरूजाकडील बाजूला गुरूवारी रात्री आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लागली. वाळलेल्या गवतामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण करत किल्ल्याला वणवा लागला. याबाबतची माहिती गडावर वास्तव्यास असणार्‍या प्रकाश साळुृंंखे यांनी टीम वसंतगडचे रामभाऊ माळी यांच्यासह अन्य सहकार्‍यांना फोन करून माहिती दिली.

त्यानंतर राज होवाळ, प्रणव चव्हाण, प्रथमेश चव्हाण, गजानन माळी, रामभाऊ माळी, दत्ता जामदार यांनी तातडीने वसंतगडावर धाव घेतली. मात्र तोपर्यंत वणव्याने रौद्ररूप धारण केले होते. अखेर मध्यरात्र उलटून गेल्यानंतर जवळपास सात ते आठ तासाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात टीम वसंतगडच्या शिलेदारांना यश मिळाले.

आवाहन करूनही अनेकांनी फिरवली पाठ …

टीम वसंतगडचे पाच मावळे आग विझवण्यासाठी रात्री गडावर पोहचले. त्यानंतर वणव्याने धारण केलेले रौद्ररूप पाहून त्यांनी व्हॉटस् तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी मदत करण्यास या असे आवाहन केले. मात्र त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही, हे आमच्यासाठी वेदनादायी असल्याची खंत टीम वसंतगडकडून व्यक्त करण्यात आली आहे.

डॉक्टर धावले किल्ले वसंतगडच्या मदतीस …

लख्ख काळोखात आग विझवण्यासाठी डॉ. महेश पाटील यांनी दिलेले आग विझवण्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर घेऊन टीम वसंतगडचे मावळे गडावर गेले. त्यावेळी डॉक्टर यांच्याकडे आग विझवण्यासाठी वापरले जाणार दहा सिलेेंडर होते. पण मनुष्यबळ कमी असल्याने ते सर्व गडावर नेता आले नाहीत. मात्र तरीही डॉक्टरांनी केलेल्या सहकार्यामुळे टीम वसंतगडला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येऊन वणव्यापासून गडाचा बचाव झाला.

Back to top button