मुंबई: पुढारी ऑनलाईन
राणा दाम्पत्य येताच आम्ही त्यांना महाप्रसाद देऊ, असे म्हणत राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी आज शनिवारी सकाळी मातोश्री बाहेर गर्दी केली आहे. त्यांना घराबाहेर घेरण्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे. शिवसेना कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबईत शनिवारी हनुमान चालिसा पठणावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सकाळी हनुमान चालिसा पठण करणार असून, त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी 'मातोश्री'समोरच ठाण मांडले आहे. मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत.
मशिदींवरील भोंगे बंद केले नाहीत, तर त्याच मशिदींसमोर वेगळा भोंगा लावून हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. भोंगे उतरवण्यासाठी मनसेने राज्य सरकारला 3 मेची डेडलाईन दिली आहे. हा विषय मशिदींवरील भोंग्यांचा असताना, यात उडी घेत राणा दाम्पत्याने थेट 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून या वादाला नवे तोंड फोडले.
राणा दाम्पत्याला अमरावतीतच रोखण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न होता. मात्र, तेथील शिवसैनिकांना गुंगारा देत राणा दाम्पत्य 'मातोश्री' मोहीम फत्ते करण्यासाठी आधीच खार भागातील फ्लॅटवर मुक्कामी दाखल झाले आहे. हे समजताच शिवसैनिकांचा मोठा जमाव त्यांच्या इमारतीसमोर शुक्रवारपासूनच भजन करीत बसला. 'मातोश्री'बाहेरही शुक्रवारी सकाळपासून शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. कारण नसताना राणा दाम्पत्य 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण करण्यास येत असून, या दाम्पत्याला धडा शिकवण्याची भाषा शिवसैनिक करत आहेत. त्यासाठी शुक्रवारी रात्रीही शिवसैनिक 'मातोश्री'बाहेर जागता पहारा देतील, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
मुंबईत पाय ठेवून दाखवा, असे आव्हान दिले होते; पण मी मुंबईत पायच ठेवला नाही, तर जिवंत उभा आहे. हनुमान चालिसा पठणासाठी अशा धमक्या मिळत असतील; तर शंभरवेळा धमक्या सहन करू, असे खुले आव्हान राणा यांनी शिवसेनेला दिले आहे.
राणा दाम्पत्याला धडा शिकवण्यासाठी 'मातोश्री'बाहेर शिवसैनिक ठाण मांडून बसले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी आली. शिवसैनिकांना पाहून उद्धव यांनी ती अलीकडेच थांबवली. गाडीतून उतरत ते शिवसैनिकांना सामोरे गेले. हात जोडून आपल्या शिवसैनिकांचे त्यांनी आभार मानले. मात्र, 'मातोश्री'समोरून जाण्याचे आवाहन त्यांनी केले नाही. शिवसैनिकांच्या आंदोलनाला पक्षप्रमुखांनीच एकप्रकारे आशीर्वाद दिल्याने शनिवारी ठरल्याप्रमाणे 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न राणा दाम्पत्याने केला, तर अनर्थ घडू शकतो. याचा अंदाज मुंबई पोलिसांना आला असून, खेरवाडी पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या खारमधील घरी जाऊन नोटीस बजावली.
'मातोश्री' हे मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान आहे. या परिसरात इतर महत्त्वाची कार्यालयेदेखील आहेत. शिवाय, मुंबईत धरणे, आंदोलने, रॅली, संप, निदर्शने आदी कार्यक्रम फक्त आझाद मैदानातच करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे 'मातोश्री' परिसरात कोणतेही आंदोलन वा निषेध कार्यक्रम करू नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला दिला.