पुणे : कर्जाचे अ‍ॅप? हे तर खंडणीखोरांचे सापळे; फोटो अश्लील स्वरूपात मॉर्फ करून ब्लॅकमेलिंग!

पुणे : कर्जाचे अ‍ॅप? हे तर खंडणीखोरांचे सापळे; फोटो अश्लील स्वरूपात मॉर्फ करून ब्लॅकमेलिंग!

अशोक मोराळे

पुणे : ऑनलाइन लिंकवर क्लिक करून कर्ज घेतले होते. त्याचे मुद्दल व व्याज त्यांना परतदेखील केले. मात्र, त्यानंतरसुद्धा पैसे भरण्याची मागणी करून शिवीगाळ केली जाऊ लागली. नातेवाइकांनाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. काही दिवसांनंतर माझे फोटो अश्लील स्वरूपात मॉर्फ करून बदनामी केली. शेवटी सततच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यात तक्रार दिली… ही आपबीती आहे विजय कांबळे (नाव बदलले आहे) या तरुणाची… पुण्यात मागील पाच महिन्यांत अशाप्रकारे 1 हजार 140 पेक्षा अधिक लोकांची फसवणूक झाली असून, अनेकांना बदनामीला देखील सामोरे जावे लागले आहे.

त्यामुळे एखाद्या ऑनलाइन अ‍ॅपद्वारे कमी वेळात मिळणार्‍या कर्जाला भुलून तुम्ही जर ही चूक करत असाल, तर वेळीच सावध व्हा.. कारण पुढील नंबर तुमचादेखील असू शकतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तत्काळ ऑनलाइन कर्ज देणार्‍या बोगस 'लोन अ‍ॅप'चा सुळसुळाट झाला आहे. सूत्रबद्ध पद्धतीने ते नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. गरजेपोटी नागरिकदेखील त्यांचे सावज होत आहेत. कर्ज घेतल्यानंतर त्यांच्या नियमानुसार कर्जाची परतफेड केली, तरी अ‍ॅपवाल्यांकडून धमकावून खंडणी उकळली जाते आहे. जर एखाद्याने पैसे नाही दिले, तर त्यांना शिव्यांची लाखोली वाहण्यापासून ते फोटो अश्लील पद्धतीने मॉर्फ करून नातेवाइकांना पाठवून बदनामी करण्यापर्यंत प्रकार होत आहेत.

गंभीर म्हणजे दिवसेंदिवस असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. काही प्रकरणांत तर कर्ज घेतले नसतानादेखील पैसे भरण्यासाठी तगादा लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही कर्ज देणारी अ‍ॅप कोठेच नोंदणीकृत नसतात, ना त्यांना सेबीचा नियम असतो. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवता येत नसल्याचे सायबर पोलिस सांगतात. नागरिकांच्या गरजेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून केवळ पैसे उकळण्यासाठीच हे अ‍ॅप सक्रिय असल्याचे दिसून येते. गुगलने असे दोनशे पेक्षा अधिक अ‍ॅप 'बॅन' केले आहेत. सायबर गुन्हेगारीतील सर्वांत वेगाने वाढणारा हा गुन्ह्यांचा ट्रेंड आहे.

असे अडकत जाता तुम्ही ट्रॅपमध्ये

  1. सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर पडवळ म्हणाले, 'सोशल मीडियावर कोणत्याही कागदपत्राशिवाय काही तासांत लोन घ्या, अशा जाहिराती दिसतात. तेथे त्यांनी संपर्क क्रमांक किंवा लिंक दिलेली असते. लिंकवर क्लिक करताच तुम्ही अ‍ॅप डाऊनलोड करता. जेथे तुम्ही 'अलाऊ' करता, त्याचवेळी तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरीचा अ‍ॅक्सेस व इतर सर्व माहिती त्यांच्याकडे जाते. गरज व माहितीचा अभाव या दोन गोष्टींमुळे तुम्ही ते सर्व करता.'
  2. 'तुम्ही पाच हजार रुपयांंचे लोन अ‍ॅपद्वारे कर्ज घेतले, तर तुमच्या खात्यात तीन हजार रुपयेच जमा केले जातात. बदल्यात तुम्ही सात ते आठ दिवसांत पाच हजार रुपये भरता. पैसे भरल्यानंतरदेखील तुम्हाला ते कर्ज भरण्यासाठी कॉल करतात. ते तुमच्या नातेवाईकांना फोन करून तुम्ही कर्ज बुडविल्याची माहिती देतात. आता त्यांना नातेवाइकांची माहिती कळली कशी? तर तुम्ही जेव्हा अ‍ॅप डाऊनलोड करता, त्याचवेळी त्यांनी तुमच्या मोबाईलचा ताबा घेतलेला असतो,' अशी माहितीही पडवळ यांनी दिली.
  3. 'तुम्ही कर्ज बुडवले असून, नातेवाइकांना जामीनदार ठेवल्याचे ते सांगतात. बनावट नोटीस पाठवली जाते. तुम्ही कर्ज घेताना दिलेल्या 'सेल्फी'चा वापर करून त्याला मॉर्फ केले जाते. न्यूड स्वरूपात तो फोटो नातेवाइकांना पाठवून तुम्ही बलात्कारी आहात असे त्यावर लिहिले जाते. शेवटी तुम्ही कंटाळून पोलिस ठाण्याचे दार ठोठावता,' असेही त्यांनी सांगितले.

रिझर्व्ह बँकेच्या समितीने सुचविले होते हे उपाय

  • ऑनलाइन कर्जपुरवठा करणार्‍या संस्थांची यादी तयार करावी
  • सर्व संस्थांची सत्यता पडताळावी
  •  ऑनलाइन कर्जाबाबत नवे नियम जाहीर करणे बंधनकारक
  •  नियमांचे उल्लंघन झाल्यास संस्थेविरोधात कडक कारवाई व्हावी
  •  ग्राहकाचा डेटा ग्राहकाच्या परवानगीशिवाय 'स्टोअर' करण्यास मनाई करावी हे करू नका..
  • लोन अ‍ॅपच्या फसव्या जाहिरातीद्वारे प्रलोभनाला बळी पडू नका
  •  कोणतेही अनोळखी ऑनलाइन कर्ज देणारे अ‍ॅप डाऊनलोड करू नका
  •  नियमानुसार रजिस्टर्ड संस्था, बँका, पतसंस्थांकडूनच कर्ज घ्या
  •  कोणालाही तुमच्या मोबाइलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरीचा अ‍ॅक्सेस देऊ नका
  •  फसवणूक झाली तर तत्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करा

गेल्या काही दिवसांमध्ये लोन अ‍ॅपवरून फसवणूक झाल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. खरे तर लोकांनी असे कोणतेही अनोळखी अ‍ॅप डाऊनलोड करू नये. त्यांना तुमचा मोबाईल क्रमांक, फोन गॅलरीचा एक्सेस देऊ नये. असे कर्ज हे प्रामुख्याने फसवणूक करण्यासाठीच दिले जात असते. तुम्हाला कर्ज हवेच असेल, तर रजिस्टर संस्था, बँका, पतसंस्थांमधून घ्यावे.

– डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबर

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news