अजब तर्कट! चोरांच्या धास्तीने ब्रिटिशकालीन पाईपलाईन काढली विक्रीला! नुकसानीपेक्षा विकलेली बरी

अजब तर्कट! चोरांच्या धास्तीने ब्रिटिशकालीन पाईपलाईन काढली विक्रीला! नुकसानीपेक्षा विकलेली बरी

सूर्यकांत वरकड

नगर : महापालिका मालकीच्या पिंपळगाव माळवी तलाव परिसरातील झाडांच्या कत्तलीचा थांगपत्ताही न लागलेल्या महापालिकेने चोरांची धास्ती घेत शंभर वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन पाईपलाईनच विक्रीला काढली आहे. याच पाईपलाईनमधून एकेकाळी नगर शहराला पाणीपुरवठा होत होता. तिचे पाईप चोरी जात असल्याचा साक्षात्कार झाल्याने प्रशासन खडबडून जागे होत हा विक्रीचा निर्णय घेतला. पाईप चोरीला गेले, तर महापालिकेचे आर्थिक नुकसान होईल, त्यापेक्षा ते पाईप काढून विक्री केले, तर लाभ होईल, असे अजब तर्कट प्रशासनाने शोधून काढले.

मनपाकडे सक्षम यंत्रणा नाही

साधारणत: 1920 सालच्या पाईपलाईनचे पाईप काढून ठेवले, तरी ते भविष्यात वापरात येईल, याची शाश्वती नाही. उलट खोदून काढलेले पाईप कोठे ठेवायचे? याची पंचायत निर्माण होणार आहे. मोकळ्या जागेत ते ठेवले, तर तेथूनही ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण संरक्षण करणारी सक्षम यंत्रणाच महापालिकेकडे नाही. त्यामुळे या प्रस्तावावर फेरविचार व्हावा, असा अभिप्राय उपायुक्तांनी टिपणीवर नोंदल्याचे दिसते.

पिंपळगाव माळवी तलावातून नगर शहराला पाणी पुरवठा करणारी 1920 सालातील पाईपलाईन महापालिका काढणार आहे. जमिनीत गाडलेली पाईपलाईन खोदून त्याचे पाईप काढण्यासाठी महापालिकेने टेंडर मागविण्याचा विषय स्थायी समितीच्या अजेंड्यावर आहे. काढलेले पाईप विक्री करून महापालिकेला आर्थिक हातभार लागेल असा तर्क त्यामागे प्रशासनाने काढला आहे.

ब्रिटिशकालीन 1920 सालात 15 इंची सीआय पाईपलाईन टाकली गेली. तेव्हापासून नगर शहराला पिंपळगाव माळवी तलावातून याच पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होत होता. शहरातील लोकसंख्या वाढल्यानंतर मुळा धरणातून नगर शहर पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकली गेली. त्यानंतर म्हणजेच 1990 पासून पिंपळगाव धरणातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मातीबंद झाली.

बंद असलेल्या या पाईपलाईनचे पाईप चोरीला गेल्याचा शोध प्रशासनाने काढला. त्यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी निदर्शनास आणून दिली. भविष्यात ही पाईपलाईन महापालिकेच्या कोणत्याच कामात येणार नाही. त्यामुळे ती पाईपलाईन लिलावाद्वारे काढून टाकावी, असा प्रस्ताव त्यावेळी समोर आला होता. आता त्याच प्रस्तावाला 'चाल' देत प्रशासनाने तो स्थायी समितीकडे पाठविला आहे. पिंपळगाव माळवी पाणीपुरवठा केंद्र ते जुनी टाकीपर्यंत वापरात नसलेली 15 इंची सी.आय. पाईप काढून कोटेशन पद्धतीने विक्री करण्याबाबत विषय मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आहे. गुरुवारी होणार्‍या स्थायी समितीमध्ये पिंपळगाव माळवीच्या पाईलाईनवर काय निर्णय होतो, याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

गंजलेल्या पाईपासाठी धडपड

पिंपळगाव माळवी तलावातून पाणीपुरवठ्यासाठी 1920 मध्ये पाईपलाईन करण्यात आली होती. आता त्या पाईपलाईनला शंभर वर्षे झाली असून, ती पूर्णपणे गंजलेली असण्याची शक्यता आहे. ती गंजलेली पाईपलाईन खोदून काढण्यासाठी निविदा काढणार आहे. ज्या कामातून कोणत्याच प्रकारचे उत्पन्न मिळणार नाही, अशा कामासाठी महापालिका खोदाईवर पैसे खर्च करणार अशी स्थिती झाली आहे.

कशाचा ताळमेळ नाही

पिंपळगाव माळवी ते नगर किती किलोमीटर पाईपलाईन आहे. यापूर्वी त्यातील किती पाईपलाईन खोदली गेली. आता किती पाईपलाईन शिल्लक राहिली. त्यात किती पाईप निघतील, याची इत्यंभूत माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. केवळ ठोकताळ्यावर पाईपलाईन मातीतून उकरून काढण्यासाठीचा विषय स्थायी समितीसमोर मांडल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news