राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसैनिक संजय पवार यांच्या नावाचीही चर्चा

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसैनिक संजय पवार यांच्या नावाचीही चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देता येणार नाही, या अटीवर शिवसेना ठाम असल्याने संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला आहे. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओ‍ळखले जातात. संजय पवार यांना उमेदवारी देऊन संभाजीराजेंना शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, संजय पवार यांनी आपल्याला उमेदवारी मिळाली तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. माझी नावाची चर्चा सुरु आहे. पण अद्याप वरिष्ठांकडून अजून काही सूचना आलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आदर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून शिवसेनेकडे पाठिंबा मागितला असला, तरी शिवसेना त्यास तयार नाही. उमेदवारी हवी असेल; तर तुम्हाला पक्ष प्रवेश करावा लागेल, अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंपुढे ठेवली आहे. मात्र, शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यास संभाजीराजे तयार नाहीत. त्याऐवजी शिवसेनापुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे.

हा तिढा सोडविण्यासाठी आणि संभाजीराजे यांचे पक्ष प्रवेशासाठी मन वळविण्यासाठी रविवारी शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना सोमवारी शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या, असा निरोप दिला; पण संभाजीराजे पक्ष प्रवेश करणार नाही, या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे चर्चा फिस्कटली आहे.

चर्चा फिस्कटल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उमेदवारी शिवसैनिकालाच मिळेल आणि शिवसेना आपला दुसरा उमेदवार सोमवारी जाहीर करेल, असे सांगितले होते; पण शिवसेनेने ही घोषणा तूर्त लांबणीवर टाकली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची ३१ मे ही अखेरची तारीख आहे. त्यामुळे काय घडामोडी होतात हे पाहून शिवसेना आपले उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. त्याचवेळी संभाजीराजेंशी अजूनही चर्चेची दारे बंद झालेली नाहीत. तिढा सोडविण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत.

संभाजीराजे यांनी 'स्वराज्य' या संघटनेची घोषणा केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून पुढे राजकारण करण्याचा मनोदयही त्यांनी जाहीर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आपण जर शिवसेनेत प्रवेश केला, तर आताच 'स्वराज्य' खालसा होईल, अशी भूमिका संभाजीराजे यांच्या समर्थकांनी त्यांच्या पुढे मांडली आहे. त्यामुळे शिवसेना पुरस्कृत उमेदवार ही अखेरची तडजोड असेल; पण शिवसेना प्रवेश होणार नाही, यावर संभाजीराजे आणि त्यांच्या समर्थकांचे एकमत आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news