संभाजीराजेंनी उमेदवारी मागितल्यास पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : चंद्रकांत पाटील | पुढारी

संभाजीराजेंनी उमेदवारी मागितल्यास पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली नाही. त्यांनी विनंती केल्यास आणि तसा प्रस्ताव आल्यास त्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

पाटील म्हणाले, संभाजीराजेंना सहा वर्षांत राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेत संधी दिली. पक्षाकडून प्रचार करा, अशी त्यांच्याकडून कधी अपेक्षा केली नाही. राजा म्हणून सन्मान केला. असा सन्मान शिवसेनने द्यायला हवा. ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ नावाचा काळ गेला. आता लोकांना सर्व कळते.

महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेल दराबाबत काही केले नाही. इतर राज्यांप्रमाणे 15 ते 20 रुपये कमी केले पाहिजे. ते केले नाही. जागतिक पातळीवर पेट्रोल-डिझेलचे दर ठरत असतात. केंद्रास खर्च आहे. राज्यास काही खर्च नाही. जागतिक पातळीवर दर कमी झाले नसताना दोन लाख 20 हजार कोटी रुपयांचा भार सोसून केंद्र सरकारने दर कमी केले आहेत.

पाटील म्हणाले, जीएसटीचा एक रुपया वसूल होताच रात्री 12 वाजता पन्नास टक्के विभागणी केली जाते. पाच वर्षे लॉस झाल्यास जीएसटी कौन्सिल देईल असा निर्णय आहे. हा लॉस देणे बाकी आहे. इतर जीएसटीबाबत केंद्र राज्याचे काही देणे नाही. महाविकास आघाडीस ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही. मध्यप्रदेश देते. तुम्ही झोपा काढता, असा आरोप महाविकास आघाडीवर त्यांनी केला. तरीही ओबीसींना आरक्षण दिल्यास सरकारला शुभेच्छा, असेही ते म्हणाले.

Back to top button