संभाजीराजे यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर | पुढारी

संभाजीराजे यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देता येणार नाही, या अटीवर शिवसेना ठाम असल्याने संभाजीराजे यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला आहे. मात्र, शिवसेनेने आपल्या उमेदवारांची घोषणा लांबणीवर टाकली असून, अजूनही चर्चेची दारे बंद झालेली नाहीत. येत्या दोन-तीन दिवसांत काय घडामोडी होतात हे पाहून शिवसेना आपले उमेदवार जाहीर करणार आहे.

माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून शिवसेनेकडे पाठिंबा मागितला असला, तरी शिवसेना त्यास तयार नाही. उमेदवारी हवी असेल; तर तुम्हाला पक्ष प्रवेश करावा लागेल, अशी अट उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंपुढे ठेवली आहे. मात्र, शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यास संभाजीराजे तयार नाहीत. त्याऐवजी शिवसेनापुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे.

हा तिढा सोडविण्यासाठी आणि संभाजीराजे यांचे पक्ष प्रवेशासाठी मन वळविण्यासाठी रविवारी शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना सोमवारी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या, असा निरोप दिला; पण संभाजीराजे पक्ष प्रवेश करणार नाही, या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे चर्चा फिस्कटली आहे.

चर्चा फिस्कटल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उमेदवारी शिवसैनिकालाच मिळेल आणि शिवसेना आपला दुसरा उमेदवार सोमवारी जाहीर करेल, असे सांगितले होते; पण शिवसेनेने ही घोषणा तूर्त लांबणीवर टाकली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची 31 मे ही अखेरची तारीख आहे. त्यामुळे काय घडामोडी होतात हे पाहून शिवसेना आपले उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. त्याचवेळी संभाजीराजेंशी अजूनही चर्चेची दारे बंद झालेली नाहीत. तिढा सोडविण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत.

पक्ष प्रवेशाने ‘स्वराज्य’ धोक्यात

संभाजीराजे यांनी ‘स्वराज्य’ या संघटनेची घोषणा केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून पुढे राजकारण करण्याचा मनोदयही त्यांनी जाहीर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आपण जर शिवसेनेत प्रवेश केला, तर आताच ‘स्वराज्य’ खालसा होईल, अशी भूमिका संभाजीराजे यांच्या समर्थकांनी त्यांच्या पुढे मांडली आहे. त्यामुळे शिवसेना पुरस्कृत उमेदवार ही अखेरची तडजोड असेल; पण शिवसेना प्रवेश होणार नाही, यावर संभाजीराजे आणि त्यांच्या समर्थकांचे एकमत आहे.

Back to top button