मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना राज्यसभेवर आपला अधिकृत उमेदवारच पाठविणार आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून तुम्हाला पाठिंबा देता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्याकडे गुरुवारी स्पष्ट केली. त्यामुळे संभाजीराजे यांची कोंडी झाली आहे. त्यांनी आधीच आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे सांगत अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. आता राज्यसभेवर जायचे असेल, तर त्यांना शिवसेनेत प्रवेश करणे भाग पडणार आहे.
10 जून रोजी होणार्या राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी 'स्वराज्य' संघटनेची घोषणा करीत त्या माध्यमातून राजकारण करण्याचेही जाहीर केले. त्यावेळी सर्व प्रमुख पक्ष पाठिंबा देतील, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी दुसरी जागा लढविणार असल्याचे जाहीर केले. तसेच संभाजीराजे यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला, तरच उमेदवारी देण्यावर विचार करण्याचे संकेत दिले. त्यामुळे संभाजीराजे यांची कोंडी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत संभाजीराजे यांनी मी कोणत्याही पक्षाचा उमेदवार नसून, मी अपक्ष निवडणूक लढवीत आहे. त्यासाठी अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला अपक्ष म्हणून पाठिंबा देता येणार नाही. आम्ही शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठविण्याचे ठरविले आहे, असे संभाजीराजे यांना सांगितल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
संभाजीराजेंच्या पाठिंब्यावर निर्णय केंद्रात होईल : फडणवीस
संभाजीराजे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय राज्यस्तरावर होत नाही, तो केंद्रीयस्तरावर होईल, असे भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवले होते. त्यावर आता केंद्रातच निर्णय होईल. भाजपचे दोन उमेदवार निवडून येतील. आमच्याकडे मते आहेत. यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून घेतला जाईल.
मुख्यमंत्र्यांची आज अपक्ष आमदारांसोबत बैठक
संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचे ठरविले असले तरी शिवसेनेने दोन उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणार्या अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या शुक्रवारी बोलवली आहे.
शिवसेनेचे 55 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पहिल्या उमेदवाराला 42 मतांचा कोटा दिला तर त्यांच्याकडे 13 मते शिल्लक राहतात. काँग्रेसचे 44 आमदार असून त्यांच्या एका उमेदवाराला 42 मते देवून त्यांची दोन मते उरतात. तर राष्ट्रवादी कडे 53 मते असून त्यांच्या एका उमेदवाराला 42 मते गेली तरी त्यांच्याकडे 11 मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तीन पक्षांकडे 26 मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दुसर्या उमेदवाराला 26 मते मिळतील. त्यांना आणखी 16 मतांची गरज आहे.