सातारा : बस्स झालं… जिल्हा खुला करा | पुढारी

सातारा : बस्स झालं... जिल्हा खुला करा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : स्स झालं… जिल्हा खुला करा सततच्या लॉकडाऊनने अन् जीवघेण्या निर्बंधांनी सातारा शहरासह जिल्ह्यातील छोटे-मोठे विक्रेते, व्यावसायिक मरणासन्न अवस्थेत गेले असून या विरोधात आता जोरदार उठाव होण्याची चिन्हे आहेत. ‘जगण्यापेक्षा मेलेलं बरं’ अशा मानसिकतेत व्यापारी व विक्रेते सापडले आहेत. जिल्ह्याचा गेल्या दहा दिवसांतील आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 6.91 टक्क्यांवर आला असून जिल्हा तिसर्‍या टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे आता पुरे झाले. बस्स करा हे सततचे लॉकडाऊन! संपूर्ण जिल्हा खुला करा. बाजारपेठा मोकळ्या करा. व्यावसायिक, विक्रेत्यांना जगू द्या. सर्वसामान्य जनतेलाही भयमुक्त वातावरणात वावरू द्या, अशी जोरदार मागणी अवघ्या जिल्ह्यातून होऊ लागली आहे.

कोरोनाने गेल्या दीड वर्षापासून जनजीवन भेदरले असून सगळ्यांचेच जगणे अवघड झाले आहे. पहिल्या लाटेतून सावरल्यानंतर सगळं काही ठीक होईल, अशी अपेक्षा होती; मात्र दुसर्‍या लाटेचा अंमल सुरू झाला अन् पुन्हा जनजीवन गडबडले. जिल्हाधिकार्‍यांनी दि. 5 एप्रिल 2021 पासून लॉकडाऊनचे आदेश जारी केले होते.

या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. हा लॉकडाऊन दि. 20 जून 2021 पर्यंत सुरू राहिला होता. त्यानंतर दि. 21 जूनपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार आठवड्याचे पाच दिवस निर्बंध घालून सुरू करण्यात आले होते. मात्र, हा केवळ पाण्यावरील बुडबुडा ठरला. केवळ दहा दिवस सुरू झालेल्या बाजारपेठा, जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट वाढल्याचे कारण देत पुन्हा लॉक करण्यात आल्या. त्यामुळे जनरल स्टोअर, कापड दुकाने, चहा टपरी, हॉटेल, ज्वेलर्स, रस्त्याच्या कडेला दुकान लावून पोटाची खळगी भरणारा छोटा विक्रेता पुन्हा गतप्राण झाल्यासारखा झाला. या व्यवसायांमुळे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय हा निष्कर्ष प्रशासन नेमका कशाच्या आधारावर काढत आहे. अगदी आजही अत्यावश्यक गरजेच्या नावाखाली बाजारपेठेत गर्दी होतच आहे. त्याला आवर कसा घालणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सध्या जिल्ह्यात प्रशासनाने टेस्टिंग वाढवले आहे. जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना गावे विभागून देण्यात आली आहेत. जिल्ह्यात दिवसाला
15 हजाराहून अधिकलोकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरटी-पीसीआर चाचण्यांचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर जवळपास निम्म्यावर घसरला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांचा

पॉझिटीव्हीटी रेट 6.91 टक्के आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या आकडेवरुन कोरोना संसर्ग कमी झाल्याचे स्पष्ट आहे. त्यावरुन जिल्ह्याचा पुन्हा तिसर्‍या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यामुळे आता सर्व बाजारपेठा खुल्या करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. वेळेचे बंधन बंद करुन बाजारपेठांना मोकळा श्वास घेवू द्या, अशी जोरदार मागणी जिल्ह्यातून होवू लागली आहे.

सातारा शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 9.2 टक्के

सातारा शहरातही कोरोना नियंत्रणात आला आहे. आठवडाभरात 358 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून शहराचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 9.2 टक्क्यांवर आला आहे. हाच रेट 10दिवसांपूर्वी सुमारे दुप्पट होता. सातारा शहराचा साप्ताहिक मृत्यूदर 0.58 टक्के आहे. शहरातील कोरोना तुलनेने नियंत्रणात आला आहे. त्यामुळे सातार्‍याच्या बाजारपेठा खुल्या होण्याची प्रतीक्षा व्यावसायिकांसह नागरिकांनाही लागली आहे.

Back to top button