अवकाळीचे प्रचंड नुकसान सरकार लपविते : प्रवीण दरेकर | पुढारी

अवकाळीचे प्रचंड नुकसान सरकार लपविते : प्रवीण दरेकर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : आठवड्याभरात झालेल्या अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण महाविकास नव्हे महाभकास आघाडी सरकार भरपाई देणे सोडाच, ती आकडेवारी लपवून शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा लाजीरवाणा प्रकार करीत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार बैठकीत केला.

यासंदर्भात येत्या विधिमंडळ अधिवेशनात सरकारला घेऊन सळो की पळो करून सोडू, असा इशारा दिला. दोन वर्षांत निष्क्रिय सरकारने एक इंचही विकास केला नाही, असा टोला त्यांनी लगावला. तीन पक्षांचे सरकार गोंधळलेेले आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे पूर्ण करू शकणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, मनिष देशमुख आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, मुख्यमंत्री अनुभवी नाहीत, त्यामुळे कामांचा त्यांना आवाका नाही. राज्य चालविणे घर चालविण्याइतके सोपे नाही. त्यामुळे या सरकारमध्ये समन्वय राहिला नाही. उलट भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सरकारचे सर्वसामान्य लोकांकडे व राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण रस्ते, मोठे मोठे प्रकल्प, सिंचन प्रकल्प, औद्योगिकीकरण सर्वसामान्यांसाठी राबविल्या जाणार्‍या योजनांकडे या शासनाचे दुर्लक्ष आहे. शेतकरी, कामगार, एसटी कामगार यांच्या समस्यांवर सरकार पळ काढत आहे. मुंबईतील अनेक विकास कामे अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीपर्यंतही हे सरकार टिकू शकणार नाही.

दरेकर म्हणाले, सध्या शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नादी लागून हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे.त्यामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे करारी हिंदुत्व आताच्या शिवसेनेमध्ये दिसत नाही. सध्याच्या शिवसेनेची निष्ठा हिंदुत्व सोडून गांधी करण्याच्या पायी टेकली आहे.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे निर्णय क्षमता नाही. त्यामुळे राज्याचे वाटोळे होत आहे. पण ते आपले अपयश झाकण्यासाठी नाहक सातत्याने केंद्र केंद्र सरकारवर टिका करीत केंद्रातील संबध बिघडवत आहेत. दुसरीकडे विकास निधी उभा करण्याची कोणती ही कल्पना सरकारकडे नाही. जर हीच परिस्थिती आणखी काही दिवस राज्यात राहिली तर शासनाच्या कर्मचार्‍यांचा पगार करायलाही पैसे राहणार नाहीत. एकूणच या सर्व परिस्थितीमुळे जनताही या महाविकास आघाडीला वैतागली आहे. परिणामी येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजप आघाडीवर राहील.

जिल्ह्यातील समस्या अन् नुकसानीची आकडेवारी घेतली

दरेकर म्हणाले, राज्यातील अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे विकासकामांवर त्याचा परिणाम झालेला आहे. शेतकरी आणि एसटी कामगारांचे अनेक प्रश्न ऐरणीवर असाताना निर्णय घेण्यास सरकार सक्षम नाही. सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्प रखडलेत, विविध प्रश्न कायम आहेत. त्याचीही माहिती घेतली आहे. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील फळबागा आणि शेतीच्या नुकसानीची आकडेवारी घेतली आहे. सरकारला याबाबत जाब विचारू.

Back to top button