काही क्रिकेटपटू बनले खासदार; काही लगेच क्लीन बोल्ड! | पुढारी

काही क्रिकेटपटू बनले खासदार; काही लगेच क्लीन बोल्ड!

सुनील डोळे

चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांप्रमाणेच दिग्गज क्रिकेटपटूही विविध कारणांमुळे चर्चेत असतात. तेही वलयांकित म्हणून ओळखले जातात. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्यासाठी राजकीय पक्षही उत्सुक असतात. राजकारणातील इनिंगमध्ये यातील सर्वांना यश लाभतेच असे नाही. त्यातील काही जण लोकसभेत पोहोचतात, काहींना मंत्री होण्याची संधीही मिळते. काही क्रिकेटपटू राजकीय मैदानात पाय ठेवताच क्लीन बोल्ड होतात. त्यांना मग दुसरा मार्ग शोधावा लागतो. यावेळच्या लोकसभेबद्दल सांगायचे तर माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला पश्चिम बंगालमधील बेहरामपूर मतदार संघातून तृणमूल काँग्रेसने तिकीट दिले आहे. त्याचा प्रचारही जोरात सुरू आहे. क्रिकेपटूंनी निवडणूक लढविणे या गोष्टीला मोठी परंपरा आहे.

नवज्योत सिंह सिद्धू

प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांवर हल्लाबोल करून चौकार आणि षटकारांची बरसात करण्यासाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेला बेडर फलंदाज म्हणजे नवज्योत सिंह सिद्धू. त्याने क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर राजकारणाच्या निसरड्या मैदानावर दुसर्‍या इनिंगला सुरुवात केली. भारतीय जनता पक्षाने त्याला उमेदवारी दिली. यानंतर तो 2004 आणि 2009 मध्ये अमृतसर लोकसभा मतदार संघातून विजयी झाला. नंतर त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमृतसर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून विजय मिळवून काही काळ त्यानेपंजाब सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्याला दणदणीत पराभव पत्करावा लागला. सध्या तो आपल्या मूळ पेशाकडे वळला असून, आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसत आहे.

कीर्ती आझाद

इंग्लंडमध्ये 1983 मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषकावर नाव कोरले होते आणि कीर्ती आझाद त्या संघाचा भाग होता. बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचा चिरंजीव असलेल्या कीर्तीने भाजपमधून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. त्याने लोकसभेची निवडणूक जिंकली. नंतर तो काँग्रेसमध्ये गेला. तिथेही संधी न मिळाल्यामुळे त्याने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील गोल मार्केट मतदार संघातून त्याने आमदारकीची निवडणूकही जिंकली होती. यावेळी तो तृणमूलच्या तिकिटावर दुर्गापूर मतदार संघातून निवडणूक लढवित आहे.

चेतन चौहान

दिवंगत क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी क्रिकेट आणि राजकीय अशी दोन्ही मैदाने लीलया गाजविली. सुनील गावस्कर यांच्यासोबत सलामीवीर या नात्याने त्यांनी बजावलेली कामगिरी आजही जुन्याजाणत्या रसिकांच्या स्मरणात आहे. 1969 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. भाजपच्या तिकिटावर त्यांनी अमरोहा लोकसभा मतदार संघातून दोनदा विजय मिळवला. एवढेच नव्हे 2017 मध्ये नौगांव सादात विधानसभा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. पाठोपाठ त्यांना काही काळ योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली होती.

मोहम्मद अझरुद्दीन

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मनगटी फलंदाजीमुळे विश्वविख्यात झालेल्या मोहम्मद अझरुद्दीन याने 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच साली उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदार संघातून तो लोकसभेत पोहोचला. नंतर 2014 मध्ये सवाई माधोपूर मतदार संघातून त्याने पुन्हा निवडणूक लढविली. मात्र, त्याच्या पदरी पराभव पडला. गेल्या वर्षी त्याने हैदराबादेतील ज्युबली हिल्स या उच्चभ्रूंची लोकवस्ती असलेल्या मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली, पण तिथेही त्याला यशाने हुलकावणी दिली.

गौतम गंभीर

माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने 22 मार्च 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला होता. त्याने तेव्हा आम आदमी पक्षाच्या आतिशी सिंह आणि काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली या नेत्यांना धूळ चारली होती. यंदाची लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच त्याने राजकारणाला रामराम केला.

विनोद कांबळी

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा बालमित्र असलेल्या विनोद कांबळी याने क्रिकेटचे मैदान गाजविल्यावर राजकारणात प्रवेश केला. लोकभारती पक्षाच्या तिकिटावर 2009 मध्ये मुंबईतील विक्रोळी मतदार संघातून त्याने निवडणूक लढवली. तथापि, त्याला पराभव पत्करावा लागला.

मोहम्मद कैफ

चित्त्याप्रमाणे चेंडूवर झडप घालून अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या मोहम्मद कैफ याने 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातील फूलपूर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या जबरदस्त फिल्डिंगपुढे त्याला हार स्वीकारावी लागली. तो थेट चौथ्या स्थानी ढकलला गेला. त्या निवडणुकीत भाजपचे केशव प्रसाद मौर्य जिंकले होते.

चेतन शर्मा

आपल्या गोलंदाजीद्वारे मैदानावर आग ओकणार्‍या चेतन शर्माला राजकीय मैदानावर पहिल्याच प्रयत्नात क्लीन बोल्ड व्हावे लागले होते. हरियाणातील फरिदाबाद लोकसभा मतदार संघातून 2009 मध्ये त्याला बहुजन समाज पक्षाने उमेदवारी दिली होती. तिथे तो पराभूत झाला.

योगराज सिंह

दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी 2009 मध्ये इंडियन नॅशनल लोकदलाच्या तिकिटावर हरियाणात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनाही राजकीय मैदानात अपयश पचवावे लागले.

मन्सूर अली खान पतौडी

क्रिकेटमध्ये ‘टायगर’ या नावाने प्रसिद्ध असलेले मन्सूर अली खान पतौडी यांना 1971 मध्ये विशाल हरियाणा पक्षाने गुरुग्राम मतदार संघातून तिकीट दिले होते. तिथे ते अपयशी ठरले. नंतर 1991 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी मध्य प्रदेशातील भोपालमधून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपचे सुशील चंद्र वर्मा यांनी त्यांचा दारुण पराभव केला.

Back to top button