नाशिक : युको बँकेवर जप्तीची टांगती तलवार | पुढारी

नाशिक : युको बँकेवर जप्तीची टांगती तलवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रविवार कारंजा परिसरातील महापालिकेच्या यशवंत मंडई या इमारतीत भाडेकरू असलेल्या युको बँकेने तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे थकविल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाने जप्तीची नोटीस बजावली आहे. थकबाकी भरण्यासाठी बँकेला शनिवार (दि.३०) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास बँकेला सील लावण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती विविध कर विभागाचे प्रभारी उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली आहे.

मार्चअखेर असल्यामुळे महापालिकेतर्फे थकबाकीदारांविरोधात जप्तीची कारवाई सुरू आहे. कर विभागाने आतापर्यंत १९७ कोटींची घरपट्टी वसूल केली आहे. घरपट्टीचे २१० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येत्या तीन दिवसांत महापालिकेला तब्बल १३ कोटींची वसुली करावी लागणार आहे. यासाठी महापालिकेने बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील ४९९ शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे तब्बल १३ कोटी ५६ लाख रुपयांची घरपट्टी थकीत असून, ती वसुलीसाठी कार्यालयांना अर्धशासकीय पत्रे पाठवली आहे. तर महापालिकेच्या यशवंत मंडई या इमारतीत चार गाळ्यांमध्ये भाडेकरू असलेल्या युको बँकेने २०११ पासून २ कोटी ९४ हजारांची भाडेपट्टी थकवली आहे. वारंवार सूचनापत्र देऊनही रक्कम भरली जात नसल्याने अखेरीस गुरुवारी भदाणेंसह पालिकेचे पथक बँकेत जप्तीसाठी दाखल झाले. परंतु,बँकेने कारवाई करू नये, अशी विनंती केली. पैसे भरण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यानंतर भदाणेंनी जप्तीची नोटीस बजावून पैसे भरण्यासाठी शनिवारपर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतरही पैसे भरले नाही तर, बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दोन कोटी ९४ हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी वारंवार नोटिसा बजावूनदेखील यशवंत मंडईतील युको बँकेने दखल न घेतल्याने अखेर जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. थकबाकी भरण्यासाठी शनिवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत पैसे न भरल्यास बँकेला सील लावण्यात येणार आहे. – विवेक भदाणे, प्रभारी उपायुक्त, विविध कर विभाग.

हेही वाचा:

Back to top button