Lok Sabha Election 2024 : जालन्यात ‘मविआ’चा उमेदवार ठरेना; जरांगे यांच्या भूमिकेकडेही लक्ष | पुढारी

Lok Sabha Election 2024 : जालन्यात ‘मविआ’चा उमेदवार ठरेना; जरांगे यांच्या भूमिकेकडेही लक्ष

सुहास कुलकर्णी

जालना लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) मतदान 13 मे रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच वेळेस मतदार संघातून निवडून आलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे जालना लोकसभेची जागा आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सोडण्यात आली असली, तरी काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्यामुळे आघाडीच्या गोटात शांतता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे काय भूमिका घेतात, याकडेही राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेला लढा संपूर्ण राज्यात नेल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) जालना जिल्ह्याच्या राजकारणावर याचे कोणते परिणाम होतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. जालना लोकसभा मतदार संघात जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, आणि पैठण या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. सहा मतदार संघात भाजप-शिवसेनेचेच वर्चस्व असल्याचे पहावयास मिळत आहे. भाजपचे उमेदवार पाच वेळेस या मतदार संघातून निवडून गेलेले असल्याने जालना लोकसभेची निवडणूक कागदावर दानवे यांना सोपी वाटत असली, तरी मागील एक वर्षात मराठा व ओबीसी आंदोलनामुळे मतदार संघातील वातावरणात मोठा बदल झाल्याचे पहावयास मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे 24 मार्च रोजी निवडणुकीबाबत भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. जरांगे कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष राहणार आहे.

रावसाहेब दावने यांनी यापूर्वीच्या दोन निवडणुकांत काँग्रेसच्या विलास औताडे यांना सहज पराभूत केल्याचे दिसून आले. मात्र, 2009 मध्ये कल्याण काळे यांनी दानवेंना घाम फोडला होता. आठ हजाराच्या फरकाने दानवे त्यावेळी विजयी झाले होते. यावेळेससुद्धा कल्याण काळे यांचेच नाव काँग्रेसकडून आघाडीवर असल्याचे ऐकावयास मिळत आहे. मराठा आंदोलनामुळे गावा-गावांतील बदललेले राजकारण आघाडीच्या उमेदवारासाठी फायद्याचे ठरणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार दानवे यांचा मतदार संघातील गावपातळीपर्यंत असलेला जनसंपर्क, निवडणुकीसाठी केलेली तयारी, मागील पाच वर्षांत केलेली रेल्वेसह इतर विकास कामे दानवेंसाठी जमेची ठरणार आहेत. जालना लोकसभा मतदार संघातील 19 लाख 36 हजार 990 मतदार जालन्याच्या लोकसभा उमेदवाराचे भवितव्य ठरविणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button