गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल : रोहित पवार | पुढारी

गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल : रोहित पवार

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- शेतकरी आज मोठ्या अडचणीत सापडला आहे. आपल्याकडील शेतकर्‍यांकडे कांदा होता. त्या कांद्याला बर्‍यापैकी बाजार भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. ही निर्यातबंदी मार्च अखेरपर्यंत आहे. आता गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल असे चित्र असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.

उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले आमदार पवार यांनी मंगळवारी (दि. 19) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. त्याप्रसंगी बाजार समिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणूकीत आपल्याला एका महाशक्तीशी लढायचे आहे. या निवडणूकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवयाचे असल्यामुळे धुळे लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.

यावेळी आमदार सुनील भुसार, माजी आमदार संजय वाघ, विलास लवांदे, माजी आमदार संजय चव्हाण, का. शा. पवार, दशरथ निकम, पवन ठाकरे, कृऊबा उपसभापती अ‍ॅड. विनोद चव्हाण उपस्थित होते.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे

अनेक वेळा आपली ताकद असताना मित्र पक्षाला संधी द्यावी लागते. कारण आपल्याला भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. त्यामुळेच धुळे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी पुर्ण ताकदीने उतरणार आहे. येत्या एक, दोन दिवसात वरिष्ठ पातळीवरुन उमेदवाराची घोषणा होईल असे सांगून आमदार पवार यांनी राज्यातील भाजप, सेनेवर सडकून टिका केली. 2014 पर्यंत महाराष्ट्र देशात एक नंबरवर होता. परंतू आता महाराष्ट्राचा कोठेच नंबर लागत नाही. या सत्ताधार्‍याच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प, उद्योगधंदे गुजरातला गेले आहेत. दरवर्षी गुजरातला 26 लाख कोटीचे करार होतात. तर राज्यात केवळ एक ते दोन लाख कोटीचे करार होतात. ज्या-ज्या वेळी भाजप राज्यात सत्तेवर आली. त्या-त्या वेळी राज्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचा आरोप ही आमदार पवार यांनी केला. बेरोजगारी, शेतकरी समस्या, पीक विमा, स्पर्धा परिक्षा पेपर फुटीवरही आमदार पवार यांनी भाष्य केले.

यावेळी ठाकरे, अ‍ॅड. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही  वाचा

Back to top button