Hiraman Khoskar | कॉंग्रेस आमदार खोसकरांची ‘सिल्व्हर ओक’ वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती | पुढारी

Hiraman Khoskar | कॉंग्रेस आमदार खोसकरांची 'सिल्व्हर ओक' वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच नाशिकमध्ये शिंदे गटाने गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण, याबाबत चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दिंडोरीमध्ये भाजपने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांना उमेदवारी निश्चित केली आहे आणि शरद पवार गटाने भास्कर भगरे यांचा प्रस्ताव आला असल्याचे सांगितले आहे, तरीदेखील महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील एकमेव आमदार हिरामण खोसकर यांनी सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवारांना भेटून उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून अनेक घडामोडी घडत आहेत. नाशिकचा विचार करता, मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले मात्र विधानसभेसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करत आमदार झालेले हिरामण खोसकर हे जिल्ह्यात एकमेव महाविकास आघाडीचे प्रतिनिधी आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर-इगतपुरी विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्यात त्यांचा संपर्कदेखील चांगला समजला जातो. सोमवारी (दि. १८) काँग्रेसचे आ. खोसकर यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याकडे महाविकास आघाडीची उमेदवारी मागितली. पण पवारांनी त्यांना तीनदा निरोप पाठवूनही तुम्ही न आल्यामुळे तिकीट दुसऱ्याला दिल्याचे सांगत त्यांची बोळवण केली असल्याचे समोर आले आहे.

पवारांकडून लोकसभेसाठी तीन वेळा विचारणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील आमदार अशी ख्याती खोसकर यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांंनी बंडखोरी केली, तेव्हा छगन भुजबळ यांनी एमईटीमध्ये बोलावलेल्या बैठकीला हिरामण खोसकर उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हाही ते अचानक नॉट रीचेबल झाले होते. त्यामुळे खोसकरही चव्हाण यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये जातील अशी चर्चा रंगली होती. पण कालांतराने ती फोल ठरली. खोसकर यांच्या कार्यालयाने याविषयी योग्य ते स्पष्टीकरण देऊन प्रकरणावर पडदा टाकला होता.

हेही वाचा-

Back to top button