Citylink Nashik | सिटीलिंकच्या संपामुळे बससेवेला ७० लाखांचा तोटा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ठेकेदाराने बुडवलेले वाहकांच्या पीएफचे थकीत एक कोटी रुपये सिटीलिंक प्रशासनाने भरूनही वाहकांनी पुकारलेला सिटीलिंकचा संप शनिवारी (दि. १६) तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. पीएफची अडीच कोटींची संपूर्ण थकबाकी जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका वाहकांनी घेतल्यामुळे या संपावर तोडगा निघू शकला नाही. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तपोवन व काही प्रमाणात नाशिक रोड डेपोतील २४७५ बसफेऱ्या सिटीलिंकला रद्द कराव्या लागल्या असून, सिटीलिंकचा सुमारे ७० लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. तर प्रवाशांचेही या संपामुळे अतोनात हाल होत आहेत.
‘मॅक्स डिटेक्टिव्हज ॲण्ड सिक्युरिटीज’ या दिल्लीस्थित वाहक पुरवठादार कंपनीच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे सिटीलिंकला गेल्या दोन वर्षांत तब्बल नवव्यांदा संपाला सामोरे जावे लागले आहे. वाहकांना नियमित वेतन अदा करण्याची जबाबदारी या ठेकेदाराची असताना महापालिकेने डिसेंबर महिन्याचे वेतन आगाऊ स्वरूपात अदा करूनही ठेकेदाराने वाहकांना ते दिले नाही. वाहकांच्या पीएफ व इएसआयसीचा निधीही जमा केला नाही. त्यामुळे वाहकांनी गुरुवार (दि.१४)पासून संप पुकारल्याने सिटीलिंकची बससेवा ठप्प झाली. सिटीलिंक व्यवस्थापनाने वाहक पुरवठादार व संपकरी वाहकांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त बैठका घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दिल्लीस्थित वाहक पुरवठादार कंपनीचे संचालक अनिल कुमार यांना पाचारण करण्यात आले. परंतु मूळ ठेकेदाराने समजूत काढूनही पोटठेकेदार असलेल्या स्थानिक वाहक पुरवठादाराने ऐकले नाही. त्यामुळे संपावर तोडगा निघू शकला नाही.
ठेकेदाराने जबाबदारी न पाळल्याने अखेर बससेवा सुरू करण्यासाठी शुक्रवारी (दि. १५) सिटीलिंकने पीएफच्या थकबाकीपोटी एक कोटी रुपये आगाऊ भरले. मात्र, त्यानंतरही वाहक संपाच्या भूमिकेवर ठाम राहिले. उर्वरित अडीच कोटी रुपयांची थकबाकी जमा करण्याची आग्रही मागणी या संपकऱ्यांकडून केली गेल्यानंतर सिटीलिंक प्रशासनाने हतबलता दर्शविली. परिणामी, शनिवारी (दि.१६) सलग तिसऱ्या दिवशी शहर बससेवा सुरू होऊ शकली नाही. तपोवनातील सर्वच १५० बसेस डेपोतच उभ्या होत्या. तर नाशिक रोड डेपोतील युनिटी या दुसऱ्या वाहक पुरवठादाराकडील वाहकांच्या जोरावर जेमतेम ३५ बसेस रस्त्यावर उतरू शकल्या.
संपकरी वाहकांविरोधात पोलिसांत तक्रार
नाशिक रोड डेपोतून सुटणाऱ्या १०० पैकी ५० बसगाड्या या जुन्याच वाहक पुरवठादाराकडील आहेत. त्यामुळे या बसेस संपामुळे बंद आहेत. सिटीलिंकमधील टीसी तसेच कंट्रोलरच्या माध्यमातून या बसेस रस्त्यावर उतरविण्याचा प्रयत्न सिटीलिंक व्यवस्थापनाच्या माध्यमातून केला गेला. परंतु संपकरी वाहकांनी या बसेससमोर रस्त्यावरच आडवे झोपत बसेस पुढे सरकू दिल्या नाहीत. सिटीलिंक प्रशासनाने संपकरी वाहकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्यास ही सेवा सुरळीत सुरू होऊ शकेल, असा आशावाद सिटीलिंक प्रशासनाने व्यक्त केला.
संप मोडीत काढण्यासाठी पर्यायी वाहक नेमणार
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वाहक परवान्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एक महिन्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात नेमण्याची कायद्यात तरतूद आहे. या तरतुदीच्या आधारे वाहक परवान्यासाठी अर्ज केलेल्या २८ उमेदवारांना वाहक म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्याची तयारी सिटीलिंक प्रशासनाने केली आहे. याशिवाय सिटीलिंकच्या कार्यालयातील टीसी तसेच अन्य कर्मचाऱ्यांनादेखील वाहकांचे प्रशिक्षण देण्यात येत असून, या माध्यमातून एकूण ६८ बसेस नाशिक रोड डेपोतून सुरू करण्याची सिटीलिंकची योजना आहे.
सिटीलिंकची सेवा पूर्ववत सुरू राहावी यासाठी वाहक पुरवठदार व संपकरी वाहकांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा सुरू आहे. हा प्रश्न सत्वर सुटावा यासाठी वाहकांचे एक कोटी रुपयांची पीएफची थकीत रक्कम सिटीलिंकने स्वत:हून पीएफ कार्यालयात जमा केली आहे. लवकरच यातून सकारात्मक मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. – मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक.