यंदाच्या पावसाळ्यात कोकण किनारपट्टीवर 22 ‘हायटाईड’ | पुढारी

यंदाच्या पावसाळ्यात कोकण किनारपट्टीवर 22 ‘हायटाईड’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात 22 दिवस समुद्राला मोठी उधाणे (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टी भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर सागरी उधाण येते. त्यामुळे किनारी भागात आपत्तीदायक घटना घडतात. यासाठी किनारी गावांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागातर्फे सागरी उधाणाचा तिमाही आढावा घेतला जातो. दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला मोठी उधाणे येत असतात. या उधाणांचा किनारपट्टीवरील भागांना बर्‍याचदा तडाखा बसत असतो. त्यामुळे पावसाळापूर्व समुद्राला येणार्‍या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर केले जाते. या दिवशी मच्छीमारांना तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले जात असतात. त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात 20 सप्टेंबरला सर्वात मोठी भरती कोकणवासीयांना अनुभवता येणार आहे. यावर्षी पावसाळ्यात 22 दिवस मोठी उधाणे येतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात जूनमधील 7, जुलैमधील 4, ऑगस्टमधील 5, आणि सप्टेंबरमधील 6 दिवसांचा समावेश आहे. या दिवशी समुद्राला साडेचार मीटरपेक्षा अधिक मोठी भरती येणे  अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनर्‍यावरील गावांना स्थानिक पातळवीर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या कालावधीत उधाणांचे पाणी किनारपट्टीवरील भागात शिरण्याची शक्यता असते. समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे शेतात खारेपाणी शिरून जमीन नापीक होऊ शकते. सखल भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच कालावधीत अशातच मोठा पाऊस झाल्यास, पाण्याचा निचरा होण्यास अडसर होतो. ज्यामुळे नद्या, नाल्यांना पूर देखील येऊ शकतो आणि येथील जनजीवन विस्कळीत होऊ शकते.

Back to top button