…तर पंतप्रधान मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल | पुढारी

...तर पंतप्रधान मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारतात आदिवासी, दलित, मागासवर्गीय लोकांची संख्या सर्वाधिक आहेत. मात्र महत्वाच्या ठिकाणी या जातीतील लोकांना स्थान नाही. त्यामुळे मी जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकतर जनगणना करावी लागेल किंवा पळून जावे लागेल, असे काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी म्हणाले. शालिमार येथे झालेल्या चौकसभेत खा. गांधी बोलत होते.

खा. गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी (दि.१४) नाशिकमध्ये आली होती. रोड शो नंतर खा. राहुल गांधी यांनी शालिमार येथे चौक सभा घेतली. यावेळी खा. गांधी यांनी जातनिहाय जनगणनेवर बोलताना सांगितले की, या देशात आदिवासी,दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक नागरिकांची लोकसंख्या कोणीही ठोस सांगू शकत नाही. मात्र ते सुमारे ९० टक्के आहेत. मात्र राजकारण, प्रसार माध्यमे, नोकऱ्यांमध्ये ९० टक्के जातवाल्यांचे ठोस अस्तित्वच दिसत नाही. या लोकांचे सर्वाधिक अस्तित्व मनरेगाच्या यादीत दिसत आहे. त्यामुळे आदिवासी, दलित, मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास हा अन्याय दुर होईल. त्यामुळे मी जातनिहाय जनगणना करण्यास सांगत आहोत. पंतप्रधान मोदी यांना जनगणना करावीच लागेल. नाही केली तर पळून जावे लागेल, असाही टोला खा. गांधी यांनी लगावला. २४ तास तुमची लुट होत असताना तुम्ही शांत कसे राहतात. हा अन्याय तुम्ही सहन का करता, तुम्ही काही बोलत नाही ही खरी समस्या आहे, असेही खा. गांधी म्हणाले. खा. गांधी यांनी जीएसटी, शेतकरी व आदिवासींची समस्या, महागाई, बेरोजगारी, पेपर फुटी या मुद्यांवर त्यांचे मत मांडले. यावेळी खा. गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेस नेते गुरुदास मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपतींना राम मंदिराच्या कार्यक्रमात डावलले

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी आहेत. त्यामुळेच त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही. कारण, भाजप त्यांना आदिवासी नव्हे वनवासी मानते. या कार्यक्रमाला धनदांडगे दिसून आले. पण तिथे एकही शेतकरी, कामगार, गरीब दिसला नाही. सरकार २४ तास तुमचा खिसा कापत असताना तुम्ही काहीच बोलत नाहीस ही खरी समस्या आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

मूळ मुद्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सर्वसामान्य जनतेचे लक्ष मूळ मुद्यांवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी जनतेची लूट करत आहे. या दोघांनंतर अमित शहा ईडी, सीबीआय, आयटीच्या माध्यमातून जनतेला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे खा. राहुल गांधी म्हणाले.

शेतकऱ्यांचे नाही तर उद्योगपतींचेही नाही

देशातील २२ जणांकडे ७० कोटी लोकांएवढे धन आहे. सरकारने उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. जर उद्योगपतींचे कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. हे कसे होत नाही ते मी पाहतो. सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता येत नसेल तर उद्योगपतींचेही करू नये, असे राहुल गांधी म्हणाले.

द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान

मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडायला आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेचं लक्ष्य दुसरीकडे वळवत आहेत. कारण भारतातील धन १० ते १५ लोकांच्या खिशात जावे, असा प्रयत्न होत आहे. भारतात सर्वात श्रीमंत २२ लोक आहेत. देशातील ७० कोटी जनतेकडे जितका पैसा आहे तितका पैसा या २२ लोकांकडे आहे. ही भारतातील आर्थिक विषमता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नमस्कार, कैसे हो आप?

खा. राहुल गांधी यांनी माईक हातात घेत ‘नमस्कार, कैसे हो आप?’ असे बोलून चौक सभेस सुरुवात केली. त्यामुळे उपस्थितांनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी प्रश्न-उत्तर स्वरुपात नागरिकांशी संवाद साधल्याने वातावरणात उत्साह होता. नागरिकांकडून मागणी होत असलेल्या प्रश्नांवरही त्यांनी त्यांची भूमिका मांडल्याने नागरिकांकडून त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. तसेच महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देणार, सत्तेत आल्यानंतर सरकारी क्षेत्रातील ३० लाख रिक्त जागा भरणार अशा घोषणा करीत गांधी यांनी नागरिकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.

Back to top button