Lok Sabha Election 2024 | खासदार शरद पवार, राहुल गांधी आज नाशिकमध्ये | पुढारी

Lok Sabha Election 2024 | खासदार शरद पवार, राहुल गांधी आज नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी, खा. शदर पवार हे नेते बुधवारी (दि.१३) नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दिग्गज नेते जिल्ह्यात येत असल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

खा. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून, बुधवारी धुळेमार्गे ही यात्रा नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. मालेगाव येथे त्यांची सभा व मुक्काम असणार आहे. या दौऱ्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तसेच राज्यातील वरिष्ठ नेते सहभागी होतील. तर खा. शरद पवार हे देखील दोनदिवसीय जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शहरात ते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी ५ वाजता निफाड येथील उगाव रोडवरील नवीन कांदा मार्केट येथे खा. शरद पवार यांंची जाहीर सभा होणार आहे. या सभेमधून ते आगामी लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडणार आहेत. त्यानंतर रात्री ते नाशिक मुक्कामी असतील. दरम्यान, खा. संजय राऊत हे देखील शहरात मुक्कामासाठी दाखल झालेले आहेत.

चांदवड येथे गुरुवारी (दि.१४) भारत जोडो न्याय यात्रा दाखल होणार आहे. खा. गांधी हे तेथे सभा घेणार आहेत. या सभेच्या निमित्ताने खा. पवार आणि राऊत हे यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. चालू आठवड्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांचे वरिष्ठ नेते नाशिकमध्ये मुक्कामी येत आहेत. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

खा. पवार-राऊत भेट शक्य
महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागांवरून अद्यापही तिढा कायम आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते केवळ वारंवार बैठकांचे सत्र सुरू असले तरी काही जागांवर आघाडीतील तिन्ही पक्षांना दावा ठोकला आहे. त्यामुळे मार्ग कसा काढायचा या विवंचनेत नेते सापडले आहेत. अशा परिस्थितीत खा. शरद पवार आणि संजय राऊत हे नाशिकमध्ये मुक्कामी असल्याने जागा वाटपाचा गुंता बघता राऊत हे खा. पवारांची भेट घेऊन चर्चा करण्याची दाट शक्यता आहे.

Back to top button