डॉक्टरने लाटले शासनाचे 54 लाख ! | पुढारी

डॉक्टरने लाटले शासनाचे 54 लाख !

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नगर येथील डॉक्टरच्या कागदपत्रांचा गैरवापर करून शासनाचे 54 लाख रुपये लाटल्याप्रकरणी शेवगावच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट करारनामा व नोटरी, तसेच खोट्या सह्या करून 232 रुग्णांवर केलेल्या उपचारांचे हे पैसे लाटले आहेत. शेवगाव येथील साईपुष्प हॉस्पिटलचे डॉ.प्रल्हाद गवाजीनाथ पाटील यांनी अहमदनगर येथील डॉ.सतीश सुधाकर त्र्यंबके यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रांचा बेकायदेशीर व संमतीशिवाय गैरवापर करून, शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 232 रुग्णांवर उपचार करून 54 लाख 50 हजार 500 रुपये लाटले. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात डॉ. त्र्यंबके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ.त्र्यंबके यांनी फिर्यादीत म्हटले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या स्थानिक अधिकार्‍याकडून शेवगाव येथील डॉ.प्रल्हाद पाटील यांनी माझ्या नावाने या शासकीय योजनेतंर्गत रुग्णांच्या उपचारापोटी मोठी रक्कम प्राप्त केल्याची माहिती 25 एप्रिल 2023 रोजी मिळाली. माझा व डॉ. पाटील यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही अथवा मी तेथील रुग्णांची तपासणीही केली नाही.

याबाबत माझी संमती न घेता माझ्या कागदपत्रांचा लबाडीने गैरवापर करून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कसा घेता, अशी नोटीसाद्वारे विचारणा केली. परंतु, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या योजनेचे वरिष्ठ अधिकारी तसेच अहमदनगर येथील सिव्हिल सर्जन यांच्याकडे लेखी तक्रार केली असता, त्यांनीही कारवाई केली नाही. 5 जून 2023 रोजी माहिती अधिकारातंर्गत माहिती मिळाली की, डॉ.पाटील यांनी माझ्या नावाचा वापर करून सन 2020 ते 2023 दरम्यान महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत 232 रुग्णांवर उपचार केले व त्या मोबदल्यात 54 लाख 50 हजार 500 रुपये शासनाकडून प्राप्त केले.

पोलिस अधीक्षक यांच्याकडे 14 जून 2023 रोजी केलेल्या तक्रार अर्जाची माहिती घेण्यास शेवगाव पोलिस ठाण्यात आलो असता, डॉ. पाटील यांनी आमच्या दोघांमध्ये करारनामा व नोटरी झाल्याबाबतचे कागदपत्र सादर केले होते. परंतु, त्यांनी सादर केलेले हे कागदपत्र खोटे असल्याचे निदर्शनास आले. यावरून डॉ. पाटील यांनी महात्मा फुले जन आरोग्य अंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारी पदवी नसताना, माझा बनावट करारनामा व नोटरी त्यावर खोट्या सह्या करून माझ्या शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रांचा संमतीशिवाय बेकायदेशीर वापर केला आणि शासनाचे पैसे लाटल्याने यात माझी, रुग्णांची व शासनाची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून डॉ. प्रल्हाद पाटील यांच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योजना समन्वयक, सिव्हिलकडून तपासणी नाही
या योजनेचे जिल्हा समन्वयक, तसेच जिल्हा रुग्णालयाने मी शेवगाव येथील साईपुष्प हॉस्पिटलमध्ये फिजिशियन म्हणून काम करतो की नाही, या योजनेला माझी मान्यता आहे की नाही, याची विचारणा करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी विचारणा अथवा तपासणी केली नाही, असे डॉ. त्र्यंबके यांनी म्हटले आहे.

Back to top button