Nashik | उद्धव ठाकरे, गेट वेल सून!….उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

Nashik | उद्धव ठाकरे, गेट वेल सून!....उपमुख्यमंत्री फडणवीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, अशी बोचरी टीका केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार करत, ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता माझे ठाम मत झाले आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मी, ‘गेट वेल सून’ एवढीच प्रतिक्रिया देईन, अशी टीका केली आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला. राज्यातील गुन्हेगारी घटनांच्या मुद्द्यावरून सरकारवर होणारे आरोप फेटाळून लावताना त्यांनी राज्यात गेल्या काही काळात ज्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, त्या निश्चितच गंभीर आहेत. पण या सर्व घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडल्या आहेत. त्यामुळे याचा थेट कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणे अयोग्य आहे. या गुन्हेगारी घटना आपापसातील हेवेदावे, भांडणांमुळे घडल्या होत्या. या प्रकरणांमध्ये योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीवरही फडणवीस यांनी भाष्य केले. भुजबळ यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांना ज्या धमक्या आल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा फेरआढावा घेतला जाईल. त्यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाईल, असे फडणवीस म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेचीही योग्य काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवारांवरही टीकास्र
घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात असून, याची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, वडेट्टीवारांना फार काही माहिती नसते. ते उगाच काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात. मात्र, या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी होईलच. पण अलीकडच्या काळात गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत त्यांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

Back to top button