वांग्याचे दर पडले; किलोला मिळतात अवघे 15 रुपये | पुढारी

वांग्याचे दर पडले; किलोला मिळतात अवघे 15 रुपये

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : वांग्याचे बाजारभाव पडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. सध्या वांग्याला प्रतिकिलो अवघा 15 रुपयांचा दर मिळत आहे. बाजारभाव कमी मिळत असल्याने वांग्यासाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वांग्याच्या पिकातून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी पीक तसेच सोडून दिले आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वांग्याचे पीक घेतले जाते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केट उपलब्ध असल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी शेतीमाल विक्रीला नेत असतात. मंजिरी, पंचगंगा-गौरव या जातीच्या वांग्याची लागवड जुन्नर विविध ठिकाणी केली जाते. वांगी लागवडीपासून ते तोडणीपर्यंत येणारा खर्च मोठा असतो. वांग्याला एकरी 90 हजार रुपये खर्च येतो.

दुसरीकडे वांग्याला पांढरी माशी, शेंडआळी या रोगांचा प्रादुर्भाव होतो. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी महागडी औषध फवारणी करावी लागत आहे. त्याचाही खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. साधारण एका किलोला 25 ते 30 रुपये बाजारभाव मिळाला, तर शेतकर्‍याला आर्थिक फायदा होतो. मात्र, बाजारभाव नसल्यामुळे तोडणी, मजुरीसाठीचा खर्चही निघेनासा
झाला आहे. सध्या वांग्याला किलोला अवघे 15 रुपये मिळत आहेत. यात तोडणी खर्चही निघत नाही. मजुरांना 300 रुपये रोज द्यावा लागतो. सध्या शेतकर्‍यांच्या अडचणी खूप वाढत चाललेल्या आहेत, अशी खंत येडगाव येथील शेतकरी तानाजी गावडे यांनी व्यक्त केली.

Back to top button