Nashik News : गोदा महाआरतीपुर्वीच वादाचे स्वर कानी, समितीच्या कारभाराविरोधात संतापाचा सूर | पुढारी

Nashik News : गोदा महाआरतीपुर्वीच वादाचे स्वर कानी, समितीच्या कारभाराविरोधात संतापाचा सूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दक्षिणवाहिनी गोदावरी नदीच्या महाआरतीसाठी शासनस्तरावरुन गठीत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या कारभारावरुन दररोज नवनविन वाद उफाळत आहे. पुरोहित संघानंतर साधु-महंतांनी समिती विश्वासात घेत नसल्याचा सूर आळवला आहे. त्यामुळे गोदेच्या महाआरतीपूर्वीच नाशिककरांच्या कानी वादाचे स्वर उमटू लागले आहेत.

वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर गंगा गोदावरीची भव्यदिव्य महाआरतीसाठी शासनाने समिती नियुक्त केली आहे. पण एककल्ली कारभारामुळे पहिल्या दिवसापासून समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. समिती व पुरोहित संघ यांच्यामध्ये निधी आणि दररोजच्या आरतीवरून कलगीतुरा रंगला आहे. समितीचे पदाधिकारी विश्वासात घेत नसल्याचा पुराेहित संघाचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्याचा प्रयत्य आला.

पुरोहित संघापाठोपाठ नाशिकमधील साधु-महंतांनी आता समितीच्या कारभारावर आक्षेप घेतला आहे. समिती ही मनमानी निर्णय घेत असून त्यात आपल्याला स्थान दिले नसल्याने साधु-महंत संतप्त झाले आहेत. येत्या १९ तारखेला होणाऱ्या गोदेच्या महाआरतीत सहभागी न होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे वादाच्या पार्श्वभूमीवर महाआरतीचा मुहूर्त पून्हा टळण्याची दाट शक्यता आहे.

निधीत वाढ

मंत्री मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत १० कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविली होती. तसा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेला पुर्नप्रस्ताव ११ कोटींवर गेला आहे. त्यामुळे वाढीव एक कोटींच्या निधीसाठी मुनगंटीवार यांनी सहमती दर्शविली आहे.

गोदा आरतीसाठी स्थापन समितीत सर्वांना योग्य ते स्थान देण्यात येईल. साधू-महंतांना स्थान देण्यासाठी वेगळी समिती गठीत केली जाईल. येत्या १९ ला गोदावरी नदीच्या जयंती सोहळ्यानिमित्ताने महाआरतीचे नियोजन केले आहे. आई गोदावरीसाठी सर्वांनी मतभेद विसरुन एकत्रित यावे. -जयंत गायधनी, अध्यक्ष, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती.

…….

रामतीर्थ येथे पूर्वापार पुराेहित संघाकडून धार्मिक कार्यक्रम केले जात आहेत. गंगा गोदावरीची नित्य नियमाने महाआरती होते. या महाआरतीला भव्यदिव्य स्वरुप प्राप्त होण्यासाठी पुरोहित संघ आग्रही होता. ही मागणी पुर्णत्वास येत असताना शासनाच्या नावाखाली दोन-चार जणांनी एकत्र येत समिती स्थापन केली. या समितीद्वारे गोदाआरती करण्याचा सुरू असलेला अट्टाहास चुकीचा आहे. -सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा-गोदावरी पुरोहित संघ, नाशिक.

हेही वाचा :

 

Back to top button