आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिका अधिकार्‍याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोखलेनगरमधील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी हा प्रकार घडला. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व धमकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गोखलेनगर भागात आशानगर परिसरात महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या 12 लाख लीटरच्या व पुणे विद्यापीठातील 60 लाख लीटरच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात येणार होते.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहणार असल्याने कार्यक्रमाची जबाबदारी फिर्यादी जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली होती. 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आपण करणार असल्याचे आमदार धंगेकर यांनी आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. दि. 26 जानेवारी रोजी अकरा वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी धंगेकर आणि त्यांच्याबरोबर कार्यकर्ते आले. त्यांनी या ठिकाणी येऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी करीत गोंधळ घातल्याचा व सर्व जणांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आंदोलनकत्र्यांना कार्यक्रम ठिकाणावरून 100 मीटर अंतरावर रोखले गेले. घोषणाबाजी करीत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी तणाव निर्माण झाला.

पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावर धंगेकर ठाम होते. वरिष्ठांशी चर्चा करून जगताप यांनी कार्यक्रमापासून काही अंतरावर श्रीफळ फोडण्याची परवानगी दिली. पोलिसांनी धंगेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी दिली. त्यानंतरही धंगेकर यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळला आणल्याचा आरोप जगताप यांनी फिर्यादीत केला आहे. चतुःशृंगी पोलिस तपास करीत आहेत.

भाजपच्या टीकेनंतर गुन्हा दाखल
या घटनेची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. धंगेकर यांनी महापालिका अधिकार्‍याला शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका अधिकार्‍यांनी निषेध केला होता. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी धंगेकर यांच्यावर टीका केली होती. जगताप यांनी फिर्याद दिल्यानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button