वादग्रस्त फलकावरून ‘एफटीआयआय’मध्ये राडा | पुढारी

वादग्रस्त फलकावरून ‘एफटीआयआय’मध्ये राडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेमधील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या आवारात ’रिमेंबर बाबरी – डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ अशा आशयाच्या फलकासह छायाचित्र प्रदर्शन लावल्याने मंगळवारी (दि.23) संस्थेमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी फलक लावल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमधील कार्यकर्त्यांनी संस्थेत शिरून फलक काढून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे संस्थेत एफटीआयआयचे विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी झडप झाली. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी केला. या घटनेनंतर एफटीआयआयमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिली. अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी (दि. 22 ) पार पडला. अशातच ’एफटीआयआय’ च्या आवारात एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने बाबरी मशिदीच्या संदर्भात फलक लावला होता.
संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरही या फलकाचे छायाचित्र पोस्ट केले होते. ही माहिती समजल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांमधील कार्यकर्ते एफटीआयआयमध्ये मंगळवारी दुपारी शिरले. एफटीआयआयच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला; पण, कार्यकर्त्यांनी त्यांना जुमानले नाही. विद्यार्थ्यांनी लावलेला फलक काढताना विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

कार्यकर्त्यांनी फलक जाळण्याचा प्रयत्न केला आणि काही विद्यार्थ्यांना त्यांनी मारहाण केल्याचा दावा एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस संस्थेच्या आवारात पोहोचले. घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी एफटीआयआयमध्ये येऊन सुरक्षेचा आढावा घेतला. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच, गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेड टाकून हा संस्थेच्या बाहेरचा परिसर बंद केला होता.

संस्थेच्या आवारात दीडच्या सुमारास काही लोकं शिरली. ते जय श्रीराम’ चा नारा देत होते. विद्यार्थ्यांना ते शिवीगाळ करायला लागले. एफटीआयआय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षाला मारहाण केली. सुरक्षारक्षक जमावाला थांबविण्यात अपयशी ठरले. जमावाने फलक जाळला. एफटीआयआयच्या सचिवाने देखील सुरक्षारक्षकाला या हल्ल्याबाबत प्रश्न केला, तेव्हा त्यालाही जमावाने मारहाण केली. त्याला वाचविण्याचा काही मुलींनी प्रयत्न केला, त्यांनाही मारहाण करण्यात आली. घटनास्थळी पोलिस पोहोचले. पण, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. हा हल्ला म्हणजे विद्यार्थ्यांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारावर झालेला हल्ला असून, हे कायदा व सुव्यवस्थेचे एका अर्थाने अपयश म्हणावे लागेल.
                                                                – एफटीआयआय विद्यार्थी संघटना

फलकाविषयी माहिती मिळताच आम्ही सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते संस्थेत गेलो. विद्यार्थ्यांनी अशा आशयाचे फलक लावून हिंदुत्वाचा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अपमान केला आहे. विद्यार्थ्यांनी धार्मिक भावना दुखावण्याचे काम केले आहे. आम्ही संस्थेत गेलो, फलक फाडले आणि जाळले. आमचा विद्यार्थ्यांच्या कृत्याला विरोध आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाही विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे.
– रवींद्र पडवळ, समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था

मारहाण करणार्‍या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल….
दीड वाजण्याच्या सुमारास एफटीआयआयमध्ये बारा ते पंधरा अनोळखी व्यक्ती एकत्र आल्या होत्या. एफटीआयआयमधील विद्यार्थी देशाच्या विरोधात काम कसे करू शकतात, असे म्हणून त्यांनी घोषणा देणे सुरू केले. सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करत संस्थेत प्रवेश केला. तसेच, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यांच्या हातातील फलक हिसकावून घेत ते जाळून टाकले. तुम्हाला बघून घेतो म्हणून धमकीही दिली, अशा आशयाची फिर्याद संजय वसंतराव जाधव (रा. वानवडी) यांनी दिली आहे. त्यानुसार मारहाण करणे, धमकावणे आणि बेकायदेशीररीत्या एकत्र येणे याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Back to top button