सुधाकर बडगुजरांना शनिवारपर्यंत अंतरिम जामीन | पुढारी

सुधाकर बडगुजरांना शनिवारपर्यंत अंतरिम जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नगरसेवक पदाचा गैरवापर करीत स्वत:च्या कंपनीला महापालिकेच्या माध्यमातून शासकीय कंत्राट मिळवून देत महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर तिघांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणूक व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तिघांनाही शनिवार (दि. २०) पर्यंत अंतरीम अटकपुर्व जामीन मिळाला आहे.

अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज प्रकरणी बुधवारी (दि. १७) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात सरकारपक्षाने युक्तिवाद करत बडगुजर यांच्या तसेच कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे सादर केली. तसेच आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी बडगुजर यांच्यासह संशयित साहेबराव रामदास शिंदे आणि सुरेश भिका चव्हाण यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. बुधवारी (दि. 17) झालेल्या सुनावणीस तिघे संशयित हजर होते. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करत आर्थिक व्यवहारांची माहिती दिली. बडगुजर यांनी कंपनीच्या नावे घेतलेले कर्ज, जागाखरेदी, वाहन खरेदीबाबत केलेले आर्थिक व्यवहारांची माहिती न्यायालयास सादर केली. बडगुजरांच्या खरेदीचे व्यवहार व त्याची रक्कम ही बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीमार्फत अदा करण्यात आल्याचे सांगितले. बडगुजर यांनी बँकेकडून घेतलेल्या चार कोटी रुपयांच्या कर्जासाठी अवघा १० हजार रुपये पगार असलेला व्यक्ती जामीनदार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार मनी लॉड्रिंगचा असल्याचा संशय ॲड. मिसर यांनी वर्तवला. तसेच या आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी बडगुजर यांच्यासह दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी सरकार पक्षाने केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत येत्या शनिवारी सुनावणी ठेवली आहे.

हेही वाचा :

Back to top button