Dhule News : गो तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर | पुढारी

Dhule News : गो तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर

धुळे : पुढारी वृत्तसेवा – मध्यप्रदेशामधून शिरपूर शहराकडे गो वंश तस्करी करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याची बाब  उघडकीस आली. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने दहा गोवंश जातीच्या जनावरांना जीवदान देण्यात यश मिळवले आहे. या संदर्भात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात कत्तलीसाठी गोवंश जातीच्या जनावरांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात असल्याची बाब यापूर्वी झालेल्या अनेक कारवायांमधून उघडकीस आली आहे. गेल्याच महिन्यात मध्य प्रदेशाच्या सीमेलगत गो तस्करांनी पोलीस पथक आणि गोरक्षकांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली .यात एक जण गंभीर जखमी झाला होता .या प्रकरणात गुन्हा देखील दाखल आहे. मात्र आता तर मध्य प्रदेशातील या गो तस्करांनी कहरच केला आहे. तस्करीसाठी तक्क त्यांनी रुग्णवाहिकेचाच वापर केला. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गुप्त माहिती मिळाली. यात मध्यप्रदेशामधून एका रुग्णवाहिकेमधून जनावरांची तस्करी होणार असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला मुंबई आग्रा महामार्गावर गस्त घालण्यास सुरुवात केली. यावेळी हाडाखेड जवळील सीमा तपासणी नाक्याजवळ एम पी 09 बीए 981 क्रमांकाची गाडी पोलीस पथकाने थांबवली. यावेळी चौकशी केली असता ही गाडी सेंधवा येथून निघून शिरपूर कडे जात असल्याची बाब उघडकीस आली. या गाडीचा चालक विजय प्रल्हाद चव्हाण तसेच त्याच्यासोबत विक्रम बाळाराम चव्हाण असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांना गाडीत काय भरले आहे, असे विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली .तपासणी अंती या गाडीमध्ये गोवंश जातीची जनावरे क्रूरपणे कोंबुन भरल्याचे निदर्शनास आले. या गाडीमधून दहा जनावरांना मुक्त करण्यात आले असून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे. या गाडीवरील चालक आणि त्याच्या सहकार्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button