Nashik Zika Virus : २४ गर्भवतींचा झिका अहवाल निगेटिव्ह, १६ अहवाल प्रलंबित | पुढारी

Nashik Zika Virus : २४ गर्भवतींचा झिका अहवाल निगेटिव्ह, १६ अहवाल प्रलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारतनगर परिसरात झिका आजाराचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची झोप उडाली होती. गर्भवतींना या आजाराची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असल्याने रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने तपासणी करत ४० गर्भवतींचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (एनआयव्ही)कडे पाठविले होते. त्यापैकी २४ गर्भवतींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही १६ अहवाल प्रलंबित आहेत. (Nashik Zika Virus)

शहरात डेंग्यूचे थैमान सुरू असतानाच, झिकानेही दोन आठवड्यांपूर्वी एंट्री केली. भारतनगरमधील २४ वर्षीय युवकाचे नमुने पॉझिटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला. झिका आजाराची लक्षणे जवळपास डेंग्यूसारखीच असून, ही लक्षणे सर्वसाधारण सौम्य स्वरूपाची असतात आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. झिकाचा सर्वाधिक धोका हा गर्भवतींना असून, गर्भवतीला झिकाची लागण झाल्यास शिशु मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृतीसह जन्माला येते. त्यामुळे ज्या भागात झिका रुग्ण आढळला, त्या भागातील गर्भवतींचा शोध घेऊन त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील कार्यशाळेत पाठविण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला होता. भारतनगर येथे झिका रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आदींना गर्भवती महिलांचा शोध घेतल्यानंतर जवळपास ४० गर्भवती आढळल्या. त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्ही लॅबला पाठविण्यात आले होते. त्यापैकी २४ महिलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

१६ अहवाल प्रलंबित (Nashik Zika Virus)

ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा, डोकेदुखी अशी झिकाची लक्षणे आहेत. महापालिकेने पाठविलेल्या ४० पैकी २४ अहवाल निगेटिव्ह आहेत, तर अद्यापही १६ महिलांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा :

Back to top button