ससून रुग्णालयात निदान, तपासणी प्रक्रियेला येणार वेग | पुढारी

ससून रुग्णालयात निदान, तपासणी प्रक्रियेला येणार वेग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयात ’हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टिम’ (एचएमआयएस) ही ऑनलाइन यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी, तपासणीचे रेकॉर्ड ऑनलाइन पाहण्यास आणि त्यानुसार प्रक्रिया वेगवान करण्यास मदत होणार आहे. राज्य शासनातर्फे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये एचएमआयएस प्रणाली कार्यान्वित होती. दीड वर्षापूर्वी ही ऑनलाइन प्रणाली अचानक बंद करण्यात आली.

त्यामुळे रुग्णसेवेचा वेग मंदावला होताच; शिवाय डॉक्टर आणि कर्मचारी यांची डोकेदुखीही वाढली होती. आता प्रणाली पुन्हा सुरू होणार असल्याने निदान आणि तपासणी प्रक्रियेला गती येणार आहे. एचएमआयएस सिस्टिमद्वारे रुग्णांचे तपशील, तपासण्या, उपचार, वैद्यकीय पार्श्वभूमी ऑनलाइन सिस्टिमद्वारे जतन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना आणि कर्मचार्‍यांना रुग्णांची माहिती हाताते न लिहिता ’एचएमआयएस’ प्रणालीद्वारे ऑनलाइन नोंदविता येणार आहे. यामुळे दीड वर्षानंतर ’ससून’मधील कारभार पुन्हा ऑनलाइन होणार आहे. राज्यातील सर्वच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमधील ’एचएमआयएस’ प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय होणार फायदे?

  • डॉक्टरांना आणि कर्मचार्‍यांना रुग्णांचा केस पेपर, दिलेले उपचार, डिस्चार्ज कार्ड याबरोबरच संपूर्ण माहिती हाताने लिहिणे होणार बंद
  • रुग्णालयातील रुग्णसेवेला मिळणार गती
  • रुग्णालयांमधील फाईल आणि कागदांचा वापर कमी होणार
  • रुग्णाला तपासताना त्याच्या वैद्यकीय पार्श्वभूमीचा डॉक्टरांना बसल्या जागी आढावा घेता येणार
  • तपासणी अहवाल एका क्लिकवर उपलब्ध
  • कमी वेळेत जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी
  • डॉक्टरांना कागदावर लिहिण्याची गरज पडणार नाही

हेही वाचा

Back to top button